प्रताप महाडिक - कडेगाव - ताकारी योजनेचा वीजपुरवठा वीजबिल थकबाकी न भरल्यामुळे वारंवार खंडित होत आहे. परंतु योजनेच्या लाभक्षेत्रातील ऊस गाळप करणाऱ्या सोनहिरा, उदगिरी, केन अॅग्रो आणि क्रांती या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून योजनेची पाणीपट्टी वसूल केली आणि तातडीने योजनेकडे ९० लाख रुपयांची रक्कम वर्ग केली. वीजबिल थकबाकी भरल्यावर योजनेचा वीज पुरवठा पूर्ववत होईल व दुसरे आवर्तनही आठवड्यात सुरू होईल.ताकारी योजना व परिसरातील कारखाने परस्परावलंबी आहेत. योजना पूर्ण क्षमतेने चालल्याशिवाय कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस मिळत नाही आणि कारखान्यांनी वसुली केल्याशिवाय योजनेला पाणीपट्टी वसूल होत नाही, याचे भान ठेवून दोन्ही बाजूंनी परस्परांना योजनेच्या सुरुवातीपासून सहकार्य केले जाते.ज्या-ज्यावेळी वीजबिल थकबाकीअभावी योजना बंद पडली, त्या-त्यावेळी मोहनराव कदम, पृथ्वीराज देशमुख व अरुण लाड हे तिन्ही कारखानदार पाणीपट्टी वसुली करून योजनेकडे रक्कम वर्ग करतात. यामुळे योजना पुन्हा कार्यान्वित होते.सध्या योजनेची ९० लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे. महावितरणने योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. रब्बी पिकांसह ऊस शेतीही धोक्यात आहे. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले. यामुळे कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून योजनेची पाणीपट्टी वसुली केली आणि योजनेकडे वर्ग केली.यामध्ये सोनहिरा साखर कारखान्याकडून ५० लाख, क्रांती कारखान्याकडून ३० लाख आणि केन अॅग्रो कारखान्याकडून १० लाख अशी जवळपास एक कोटी रुपयांची पाणीपट्टी वसुली करून योजनेकडे वर्ग केली आहे. आता योजनेकडून कृष्णा खोरे विकास महामंडळही रक्कम महावितरणकडे भरेल आणि वीज पुरवठा पूर्ववत होईल. ६ फेब्रुवारीपर्यंत योजनेचे दुसरे आवर्तनही सुरू होणार आहे. ताकारी उपसा सिंचन योजनेची पाणीपट्टी आकारणी, वसुली ही कामे कार्यक्षमपणे करण्यासाठी स्वतंत्र सिंचन विभागाची गरज आहे. टेंभू योजनेला स्वतंत्र सिंचन विभाग मंजूर झाला आहे. परंतु तिथेही कर्मचारी वर्ग अपुरा आहे. ताकारी योजनेलाही लाभक्षेत्राची पारदर्शक पध्दतीने मोजणी, पाणीपट्टी आकारणी व वसुली होणे गरजेचे आहे. याशिवाय लाभक्षेत्र दडवणाऱ्या बड्या शेतकऱ्यांनीही प्रामाणिक लाभक्षेत्राची पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे.
ताकारीच्या दुसऱ्या आवर्तनाचा मार्ग मोकळा
By admin | Updated: February 2, 2015 00:17 IST