प्रदीप पोतदार - कवठेएकंद नागाव कवठे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा आपला ऊस घालविण्यासाठी साखर कारखाना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. परिसरात सुमारे तीन हजार एकर उसाचे क्षेत्र आहे. सर्व कारखान्यांच्या मिळून १८ ते २० इतक्याच टोळ्या आहेत. त्यामुळे ऊस तोडणी यंत्रणाच अपुरी असल्यामुळे परिसरातील ऊसतोडी मंदगतीने सुरू आहेत.साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होण्यास महिनाभर विलंब झाला होता. त्यामुळे ऊस तोडणी यंत्रणा उशिराच उपलब्ध झाल्याने हंगाम लांबणीवर जाणार आहे. परिपक्व ऊस पाठविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. वेळेत ऊस गेल्यासच उसाचे वजन चांगले मिळणार असल्याने ऊस घालवण्यासाठी जास्त प्रयत्न केले जात आहेत. परंतु अपुरी यंत्रणा असल्याने तोडणीवर परिणाम झाला असून ऊस तोडणी मिळवण्यासाठी साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांचे मुकादम, कारखान्यांचे स्लिपबॉय, कर्मचारी यांचे भाव वधारले आहेत. कवठेएकंद - नागाव कवठे परिसरात यंदाच्या हंगामासाठी जाणाऱ्या उसाचे क्षेत्र २६०० ते २८०० एकर इतके आहे. यापैकी सुमारे ५०० एकर उसाची तोडणी झाली आहे. अद्याप उर्वरित उसाची तोडणी लवकरात लवकर होण्यासाठी साखर कारखान्यांनी ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या वाढविण्याची गरज आहे.एकीकडे ऊस दराचे चित्र स्पष्ट नाही. ऊस घालवण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. त्यातच यंदा अति पावसामुळे ऊस उत्पादनात घट, असे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात घटच होणार आहे. यामुळे उसाबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. काही भागामध्ये उसाला तुरे फुटू लागले आहेत. त्यामुळे उसाच्या वजनात आणखी घट निर्माण होणार आहे.वाहतुकीला रस्त्यांचा अडसरशिवारातील ऊसतोडणीबरोबरच ऊस वाहतूक करणे आव्हान ठरत आहे. अति पाऊस आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे शिवारातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. येथील नांद्रे वाट, डिग्रज वाट, मिरज वाट, वाडी वाट अशा रस्त्यांवरून शेतकऱ्यांना ये-जा करणे अडचणीचे ठरते. त्यामुळे ऊस वाहतूक करणे तारेवरची कसरत ठरत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मुरूम टाकून लोकवर्गणीतून रस्ते दुरुस्ती करून पर्यायी व्यवस्था केली आहे. परंतु चांगल्या रस्त्यांअभावी ऊस वाहतुकीला अडसर येत आहे.
ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांची दमछाक
By admin | Updated: December 29, 2014 23:53 IST