सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील फरारी अकराव्या संशयितास अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास शनिवारी सकाळी यश आले. मोतिराम दत्तू चव्हाण (वय ५६, रा. तेरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्यास १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बनावट नोटांची छपाई करुन त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा गेल्या महिन्यात पर्दाफाश करण्यात आला होता. टोळीचा सूत्रधार प्रवीण कांबळे याच्यासह आप्पासाहेब घोरपडे, ऐनुद्दीन ढालाईत, सुभाष पाटील, रमेश घोरपडे, इम्रान ढालाईत, प्रभाकर रावळ, संदीप मुडलगी, दीपक हुडेंद, बालाजी निकम या दहाजणांना अटक केली होती. त्यांच्याकडून ३४ लाख ३५ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या सर्व नोटा हजाराच्या होत्या. नोटा छपाईसाठी वापरलेली यंत्रसामग्रीही जप्त केली होती. यातील चव्हाण हा फरारी होता. तो शनिवारी सकाळी तेरवाडमध्ये आला असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, हवालदार बापू चव्हाण, दीपक पाटील यांच्या पथकाने त्यास पकडले. शनिवारी दुपारी त्याला मिरज येथील न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने त्याला १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. निरीक्षक घनवट पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
बनावट नोटा; फरारी एकास अटक
By admin | Updated: August 9, 2015 00:46 IST