नॉटिंगहॅम विद्यापीठ, लंडन येथून व्यवसाय व्यवस्थापनमध्ये एम. एस. पदवी घेतली आहे. ते युवा उद्योजक आहेत. काळाची व समाजाची गरज ओळखून त्यांची वाटचाल सुरू आहे. बेरोजगारांच्या हातास काम व युवा पिढी बौद्धिकदृष्ट्या सक्षम झाल्यास ग्रामीण भागाची कौटुंबिक प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. त्या दृष्टीने भविष्याचे नियोजन करायला हवे, हा सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीचा विचार घेऊन शिराळा तालुक्याच्या चिखली गावातून विराज मानसिंगराव नाईक यांचे नेतृत्व आकार घेत आहे.
युवा वर्गाची साथ व वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद घेत सध्या हे नेतृत्व तालुक्याची औद्योगिक, सामाजिक, भौगोलिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय पातळीवरील स्थिती जाणून घेण्यात व्यस्त आहे. सभा, समारंभात भाषणे करण्यापेक्षा सर्वप्रथम ज्या विभागाच्या प्रगतीसाठी, ज्या मातीतील माणसांसाठी झटायचे आहे. प्रत्येक माणूस जाणून घेण्याची आवड या युवा नेत्यात असल्याचे मी अनेकदा जवळून पाहिले आहे.
विराज नाईक यांनी पुण्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. आजोबा स्व. लोकनेते फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) यांचा नातू व कर्तृत्वान नेतृत्व म्हणून नावलौकिक मिळविलेले ‘विश्वास’ व ‘विराज’ उद्योग समूहाचे प्रमुख, आमदार मानसिंगराव नाईक यांचा मुलगा म्हणून विराज नाईक थेट राजकारणात येऊ शकले असते. पण त्यांनी स्वकर्तृत्व सिद्ध करून, सामाजिक जाणिवांचा, अडचणींचा अभ्यास करून समाजकारणात पाय ठेवण्याचे निश्चित केले. ‘विराज’ उद्योग समूहातील विविध प्रकल्पांमध्ये लक्ष घालत त्यांनी औद्योगिक प्रगती साधण्याच्या उद्दिष्टास प्राधान्य दिले.
ग्रामीण भागात संस्थांची यशस्वीपणे उभारणी झाली, की रोजगार उपलब्ध होतो. कुटुंबातील एका व्यक्तीच्या हाताला काम मिळाले, की ते कुटुंब प्रगतीकडे वाटचाल करते, यावर युवा नेते विराज यांचा विश्वास आहे. त्यामुळेच ‘विराज इंडस्ट्रीज’मध्ये विविध प्रकल्पांची यशस्वीपणे उभारणी केली. त्यांच्या प्रगतीचा आलेख सतत चढता ठेवला आहे. औद्योगिक प्रगतीमधील स्थिरतेनंतर ‘विराजदादा’नी युवा वर्गाशी संपर्क ठेवण्यास सुरुवात केली. शिराळा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील युवा वर्गात सततच्या संपर्कातून त्यांनी आपली छाप उमटवली आहे. मितभाषी, सालस, अभ्यासू, सामाजिक जाणिवेची भान असलेला व हाकेला प्रतिसाद देणारा युवा नेता म्हणून ‘विराज’ यांच्याकडे पाहिले जात आहे. एखादी गोष्ट समजून घेण्याची व ती पूर्णपणे समजल्याशिवाय न थांबण्याची पद्धत समाजकारणात असलेल्या युवा नेतृत्वाकडे जशी असायला पाहिजे, तशी निश्चितच त्यांच्या नेतृत्वात नक्कीच आहे.
तालुक्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणून ‘विश्वास’कडे पाहिले जाते. ‘विश्वास’ला लोकनेते फत्तेसिंगराव नाईक व त्यांच्यानंतर मानसिंगराव नाईक हे दूरदृष्टीचे व काळाची पावले ओळखून प्रगती साधणारे नेतृत्व लाभले. म्हणून विश्वासची एवढी मोठी प्रगती झाली, हे विसरून चालणार नाही. कारखान्यात विविध उपपदार्थनिर्मिती प्रकल्पांची यशस्वी उभारणी हे मानसिंगभाऊंचे कर्तृत्व आहे. त्यामुळेच आज ऊसदराच्या व जागतिकीकरणाच्या स्पर्धेत विश्वास कारखाना दिमाखदार कामगिरी बजावत आहे. हजारो संसार सुखाचे व आनंदी जीवन कंठत आहेत. एक उद्योग यशस्वी झाला, तर किती कायापालट व प्रगती होऊ शकते, त्याचे ‘विश्वास’ हे मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणूनच औद्योगिकीकरणाची कास धरत समाजकारण करण्याचा मूलमंत्र विराज नाईक यांनी सार्वजनिक जीवनाच्या पदार्पणातच स्वीकारला आहे. हे कसदार नेतृत्वाचे लक्षण म्हणावे लागेल.
चांदोलीचा पर्यटन विकास, गुढे-पाचगणी पठार हे थंड हवेचे ठिकाण, उत्तर भागाच्या विकासाची वाकुर्डे बुद्रूक सिंचन योजना व गिरजवडे प्रकल्प, शिराळ्याची औद्योगिक वसाहतीत नवनवीन तंत्रज्ञानावरील उद्योगांची उभारणी केली आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे सक्षमीकरण, उच्च शिक्षणाची सोय, उच्च वैद्यकीय उपचाराच्या सोई, शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, एकरी उत्पादनवाढीचे प्रयत्न, दुग्ध व्यवसायातील आधुनिकता, सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेव्याची जपणूक आदी पातळीवर अखंडपणे काम करायला पाहिजे व त्यानंतर राजकीय संघर्षाला स्थान द्यायला हवे, ही भूमिका, असा विचार घेऊन ‘विराज’ नावाचे नेतृत्व आकार घेत आहे.