गजानन पाटील - संख -- जत तालुक्यातील तिकोंडी, संख, भिवर्गी परिसरातील १ ते २५ डिसेंबरमध्ये उशिरा छाटणी झालेल्या द्राक्षाची काढणी सुरू झाली आहे. अवकाळी पाऊस, व्यापाऱ्यांची नफेखोरीची वृत्ती, मंदी यामुळे द्राक्षांचा दर कमी करून बागायतदारांची लूट केली जात आहे. सध्या द्राक्षाला वाण व दर्जानुसार ३५ ते ५२ रुपये दर मिळत आहे. बाजारात मालाची कमी आवक असून, द्राक्षाला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी असमाधानी आहेत. औषधांच्या, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, मजुरीच्या दरातील वाढ व मशागतीचा खर्च यामुळे द्राक्ष बागायतदार आधीच मेटाकुटीला आला आहे.प्रतिकूल परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिंबक सिंचन, मडकी सिंचनाने व शेततलाव काढून फोंड्या माळावर द्राक्षबागा उभारल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबध्द वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जात आहे. जत तालुक्यामध्ये ४ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. स्वच्छ हवामान, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दर्जेदार बेदाण्याची निर्मिती केली जात आहे. तालुक्यातील उमदी, संख, भिवर्गी, बिळूर, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, रामपूर, डफळापूर, जालिहाळ बु।।, कोंतेवबोबलाद, मुचंडी, दरिकोणूर, अमृतवाडी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. तीन टप्प्यात छाटणी करून उत्पादन घेतात. काही बागायतदार अगाप जुलै महिन्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात, सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते आॅक्टोबर, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत छाटणी घेतात. तिसरा टप्पा मागास छाटणी डिसेंबरमध्ये घेतात. यावर्षी डिसेंबर महिन्यापासून अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, वातावरणातील बदल यासारख्या संकटांचा सामना करीत द्राक्षबागा आणल्या आहेत. थिनिंग, जिब्रॅलिक अॅसिड (जीए) यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. वाढती मजुरी, महागड्या औषधांनी द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादन चांगले आले आहे. परंतु व्यापाऱ्यांकडून कमी दर देऊन शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे.द्राक्षाची जात वर्ष २०१४ वर्ष २०१५ शरद सोनाक्का७१ रु. ५२ रु. माणिक चमन६० रु. ४५ रु. सुपर सोनाक्का६८ रु. ५० रु. थॉमसन५२ रु. ३५ रु. व्यापाऱ्यांच्या फसवणुकीमुळे रोखीने व्यवहारजत पूर्व भागात तिकोंडी, भिवर्गी, संख परिसरात द्राक्षबागांची छाटणी डिसेंबरमध्ये केली जाते. ही द्राक्षे मे, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बाजारात येतात. एकरी १५ ते २० टन कच्चा माल काढला जातो. साखर १०० टक्के भरते. वजन चांगले भरते. बेदाण्यापेक्षा मार्केटिंगची द्राक्षे परवडतात, असे बागायतदारांचे मत आहे. द्राक्ष खरेदीसाठी भागात दलाल दाखल झाले आहेत. द्राक्ष, डाळिंब खरेदी करणाऱ्या दलालांकडून शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसविल्याची उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे सर्वत्र सावध पवित्रा घेऊन रोखीने व्यवहार केले जात आहेत. अवकाळी पावसाने द्राक्षात कमी शुगर तयार झाल्याने गोडी कमी आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कमी मागणी आहे.
दलालांच्या नफेखोरीमुळे जतमध्ये द्राक्ष उत्पादकांची पिळवणूक
By admin | Updated: May 13, 2015 00:53 IST