सांगली : जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री तसेच शुक्रवारी पहाटे व सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे हवेत काही काळ गारवा निर्माण झाला असला तरी कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यात बेदाण्याचे नुकसान झाले. मांगले (ता. शिराळा) येथे वाऱ्याने उडालेला घरावरील पत्रा लागून महिला जखमी झाली. त्याचप्रमाणे रब्बी पिकांसह आंब्याचेही नुकसान झाले. शिराळा : शिराळा तालुक्यास गुरुवारी रात्री अडीचच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. या अवकाळी पावसामुळे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, तर मांगले येथे एका घराचा पत्रा उडून लागल्याने सुशिला तानाजी मोहिते (वय ५५) ही महिला जखमी झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.गुरुवारी दिवसभर उकाड्याने नागरिक त्रस्त होते. रात्री अडीचच्या दरम्यान ढगांचा गडगडाट, वीज, तसेच वादळी वारा सुटला व दमदार पावसाने सुरुवात केली. हा पाऊस जवळजवळ दीड तास सुरू होता. या पावसाने सागाव, कोकरूड, मांगले, चरण, शिरसी, अंत्री, चांदोली धरण परिसर, शिराळा शहर, आरळा, बिऊर, कणदूर आदी सर्व ठिकाणी या पावसाने हजेरी लावली.पावसाबरोबर सुरू असलेल्या वादळामुळे मांगले येथील सुशिला तानाजी मोहिते यांच्या घरावरील पत्रा उडून गेला. हा पत्रा त्यांच्या डोक्याला लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. त्त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य भिजले व घराचे नुकसान झाले आहे. शौचालयावर झाड पडल्याने त्याचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, मका आदी पिके काढणी सुरू असताना या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांचे गवत, कडबा भिजल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंतिम टप्प्यातील ऊस तोडणी या पावसामुळे पुन्हा खोळंबली आहे. शिराळा येथे २५ मि.मी., शिरसी ५, कोकरूड ५ , चरण १५, मांगले २२, सागाव ४८, तर चांदोली धरण परिसरात ३५ मि.मी. पाऊस पडला. येळापूर : शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास तालुक्याच्या पश्चिम भागासह वारणा पाणलोट क्षेत्रात विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस एक तास सुरु होता. हात्तेगाव येथील महादेव पाटील यांच्या घराच्या छतावरील कौले उडून गेली. त्याचबरोबर पाचगणी, गुढे, खिरवडे आदी गावातील लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने उरल्यासुरल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.सागाव : शिराळा तालुक्यातील सागाव व परिसरात गुरुवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे मका, भुईमूग, गहू, आंबा पिकाचे नुकसान झाले.गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वादळी वारे व गारपीटीसह पाऊस पडला. पावसाने मका, भुईमूग, गहू, आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतात पाणी भरले आहे. काही ठिकाणी झाडे पडली, तर काही वेळासाठी वीज देखील खंडित झाली होती. सागावसह, वाडीभागाई, कणदूर, ढोलेवाडी, पुनवत, खवरेवाडी, फुफीरे, नाटोली, चिखली, कांदे या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी ऊस व मका पिकेदेखील पडली आहेत. कुरळप : वशी (ता. वाळवा) परिसराला गुरुवारी रात्री गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरु झाला. रात्री २ च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे घराच्या बाहेर झोपलेल्या नागरिकांची पळापळ झाली. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य या पावसात भिजले. आटपाडी : आटपाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपासून आटपाडीतील तापमान ३८ अंशावर पोहोचल्याने जिवाची काहीली झालेल्या आटपाडीकरांना पावसाने दिलासा दिला. १०-१२ मिनिटे आलेल्या पावसाच्या सरीने हवेत गारवा निर्माण झाला.देशिंग : कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग, हरोली, बनेवाडी, खरशिंग, परिसरामध्ये गुरूवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. सध्या देशिंग, खरशिंग परिसरामध्ये बेदाण्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. वीस ते २५ टक्के बेदाणा शेडवर शिल्लक आहे. शेडवर असलेल्या बेदाण्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सलगरे : मिरज तालुक्यातील सलगरे, चाबुकस्वारवाडी, कोंगनोळी, बेळंकी परिसरात शुक्रवारी दुपारीतीन वाजता अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. नंतर सायंकाळी सहा वाजता वारे व मेघगर्जनेसह पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसाने कलिंगडासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)शिरसटवाडीत घरांचे नुकसानशिराळा पश्चिम भागातील परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे २५ हून अधिक घरांचे नुकसान झाले, तर दोन कुटुंबे बेघर झाली आहेत. विजेचे खांब कोसळल्याने पहाटेपासून वीज पुरवठाही खंडित झाला आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने शिरसटवाडी येथील बाबूराव शिरसट, सुधाकर शिरसट, उत्तम शिरसट, पांडुरंग शिरसट, भीमराव शिरसट, गणपत शिरसट, शिवाजी शिरसट, धोंडीराम शिरसट, महादेव शिरसट, अशोक शिरसट आदी लोकांच्या घरांच्या छतावरील कौले उडून गेली. तसेच एका घराची भिंत कोसळली.करोली, सोनीमध्ये पावसाने कंबरडे मोडले
जिल्ह्यास पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा
By admin | Updated: April 11, 2015 00:10 IST