लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली असून पाच ठिकाणी बोटींची व्यवस्था केली आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली. कोरोना बरोबरच पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तहसीलदार शिंदे म्हणाले की, दि. १ जूनपासून चोवीस तास तहसीलदार कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. हा कक्ष दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. नोडल अधिकारी नेमणूक केले आहेत. लाईफ जॅकेट, रिंग, रोप, बॅग्ज, मेगाफोन, बॅटरी हे साहित्य उपलब्ध केले आहे. तालुक्यातील स्वयंसेवी संस्था, शोध व सुटका पथक यांची माहिती संकलित करून त्यांना आपत्ती वेळी कोणत्या प्रकारे मदत कार्य करावयाचे याबाबत प्रशिक्षण व माहिती देण्यात आली आहे. गावनिहाय आराखडे करून ब्लू व रेड लाईनमध्ये येणाऱ्या घरांची, नागरिकांची माहिती तयार केली आहे. बुलडोझर, पाण्याचे टँकर, अर्थमुव्हर, जनरेटर आदींचे नियोजन केले आहे. २०१९ मध्ये २१ गावातील ६१३ कुटुंबातील २ हजार ९६७ नागरिकांचे तर २ हजार ८१५ जनावरांचे स्थलांतर केले होते. सांगाव, मराठेवाडी, काळूनद्रे, मांगले, देववाडी, कांदे, कोकरूड येथे पुराचा जास्त फटका बसला होता. मांगले, सांगाव, कोकरूड, आरळा, चरण या पाच ठिकाणी बोटींची व्यवस्था केली आहे. सर्व ठिकाणी या बोटींची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.