दिलीप मोहिते ल्ल विटा गेल्या अनेक पिढ्यांपासून दुष्काळाने पाय रोवलेल्या खानापूर तालुक्याच्या पूर्व भागाला आता अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनामुळे हरितक्रांतीचा टिळा लागण्याचा क्षण अंतिम टप्प्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियान, लोकसहभाग व प्रशासनाच्या प्रयत्नातून खानापूर तालुक्यातून उगम पावलेल्या अग्रणी नदीपात्राचे २० कि.मी. अंतरापर्यंत खोलीकरण व रुंदीकरण पूर्ण केल्याने अग्रणी पुनरुज्जीवनाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे दुष्काळी खानापूर तालुक्यातील या ‘अग्रणी पॅटर्न’चा संपूर्ण महाराष्ट्रभर गवगवा झाला आहे. परिणामी, लोकसहभाग व प्रशासनाच्या अथक् परिश्रमातून सव्वादोन कोटीचे हे काम अवघ्या पन्नास लाखाच्या निधीत पूर्ण झाल्याने अग्रणी नदीने मोकळा श्वास सोडला आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या या अग्रणी पुनरुज्जीवनाच्या कामाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते लवकरच अग्रणी नदीचा पाहणी दौरा करणार आहेत. खानापूर तालुक्यात दुष्काळ पाचवीला पूजलेला आहे. शेतीपाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असलेल्या या खानापूर तालुक्यात ‘टेंभू’च्या माध्यमातून हरितक्रांती आणण्याचे प्रयत्न शासकीय व राजकीय पातळीवर झाले. परंतु, ‘टेंभू’पासून वंचित राहणाऱ्या खानापूर तालुक्याच्या पूर्व भागाला कायमस्वरूपी पाणी देण्याचा प्रयोग अयशस्वी झाला आहे. त्यामुळेच खानापूर तालुक्यातून उगम पावणाऱ्या अग्रणी नदीपात्राच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाची कल्पना समोर आली. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून हे काम पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. परंतु, तालुक्याच्या कार्यक्षेत्रात या नदीचे २० कि.मी. अंतराचे पात्र आहे. हे काम पूर्ण करणे शासनाच्या निधीवर अवलंबून न ठेवता ते लोकसहभागातूनही पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रांताधिकारी सचिन इथापे व तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी विविध संस्था व लोकांना आवाहन केले. आ. अनिल बाबर यांनीही प्रयत्न केले. त्यामुळे सहकारी व सेवाभावी संस्थांनी साडेनऊ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला.
खानापूरच्या ‘अग्रणी पॅटर्न’चा राज्यात डंका
By admin | Updated: September 10, 2015 00:37 IST