अशोक डोंबाळे- सांगली --जिल्ह्यात यावर्षी गळीत हंगामासाठी ७२ हजार हेक्टर क्षेत्रातील ९० लाख मेट्रिक टन ऊस येणार आहे. यामध्ये कृष्णा आणि वारणा नदीकाठीच ८० टक्के उसाचे क्षेत्र असून, हा ऊस गाळपासाठी नेण्याचे साखर कारखान्यांसमोर आव्हान आहे. वसंतदादा कारखान्याचे अद्याप गाळप सुरु नसून ‘तासगाव’चा हंगाम बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर दहा लाख टन उसाचे वेळेत गाळप होण्याची शक्यता नाही. दुसऱ्या बाजूला दुष्काळी तालुक्यातील साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध होण्याची शक्यता दिसत नाही. यामुळे तेथील कारखान्यांकडून उसाची पळवापळवी सुरू झाली आहे.२०१३-१४ वर्षाच्या गळीत हंगामामध्ये जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी ७२ लाख ६७ हजार टन उसाचे गाळप करून ८९ लाख ५९ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले होते. २०१४-१५ या वर्षाचा गळीत हंगाम सुरु करण्याची १६ साखर कारखान्यांनी तयारी दर्शविली आहे. परंतु, सध्या केवळ तेरा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत. खानापूर तालुक्यातील नागेवाडी (गणपती जिल्हा संघ) साखर कारखान्याचा गळीत हंगाम दोन दिवसात सुरू होणार आहे. याबद्दल कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक गोंजारी म्हणाले की, पाच लाख टन उसाची नोंदणी झाली आहे. परंतु, हंगाम उशिरा सुरु झाल्यामुळे तीन ते साडेतीन लाख टन उसाचेच गाळप करू शकतो.आटपाडीच्या माणगंगा साखर कारखान्याचाही हंगाम अद्याप सुरु झालेला नाही. या कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्यामुळे हंगामाला उशीर झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वसंतदादा कारखान्याने ऊस उत्पादकांचे बिल दिले नसल्याने गाळप परवाना साखर आयुक्तांनी रोखला आहे, परंतु कारखाना प्रशासनाने परवाना मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. परवाना मिळाला तरच हंगाम सुरू होणार आहे. जर वसंतदादा कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला नाही, तर त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाच ते सहा लाख टन ऊस गाळपाचा प्रश्न गंभीर होणार आहे. तासगाव कारखानाही बंदच राहणार असल्यामुळे तासगाव, पलूस तालुक्यातील पाच ते सहा लाख टन ऊस गाळपाचा प्रश्न उभा ठाकणार आहे.कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या परिसरातील साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालले तरीही ते जास्तीत जास्त ७५ लाख टनापर्यंत उसाचे गाळप करू शकतात. परंतु, जिल्ह्यात उसाचे क्षेत्र ७२ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. हेक्टरी १२० टन ऊस गृहित धरल्यास जिल्ह्यातून ९० लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. ७५ लाख टन ऊस जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळप केला, तर उर्वरित १५ लाख टन ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होणार आहे. याशिवाय, माणगंगा, नागेवाडी, श्री श्री रविशंकर, डफळे, महांकाली, मोहनराव शिंदे या साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र अन्य जिल्हे आणि कर्नाटकातही आहे. तेथूनही त्यांना मोठ्याप्रमाणात कमी पैशात उसाची उपलब्धता होणार आहे. जिल्ह्यातून बाहेरील कारखान्यास म्हणजे वारणा आणि यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्यास ऊस जाणार आहे. उर्वरित सर्व ऊस जिल्ह्यातील कारखान्यांकडेच जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऊस वेळेत गाळपास जाणार की नाही, याची चिंता लागली आहे. कारखान्याने अद्याप उसाचा दरही जाहीर केला नाही. याचीही शेतकऱ्यांना चिंता आहे.तीन कारखान्यांचे गाळप सुरूच नाहीजिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करण्यासाठी परवाना मागितला आहे. यापैकी पंधरा कारखान्यांना परवाना मिळाला असून वसंतदादा कारखान्याचा ऊस बिलाच्या थकबाकीमुळे परवाना थांबविला आहे. यामुळे ‘वसंतदादा’चा गळीत हंगाम अद्याप सुरु नाही. याचबरोबर यशवंत (गणपती संघ) आणि माणगंगा साखर कारखान्याचाही गळीत हंगाम सुरु नाही. परंतु, येत्या दोन दिवसात त्यांचे गाळप सुरु होण्याची शक्यता आहे.४पंधरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होणार
ऊस गाळपाचे आव्हान आणि पळवापळवीही
By admin | Updated: November 28, 2014 23:47 IST