अशोक पाटील --इस्लामपूर आगामी नगरपालिकेसाठी जनतेतून निवडून देण्यासाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण पडण्याआधीच सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधकांत कुरघोड्यांच्या चर्चांना उधाण आले आहे. खुल्या पुरुष प्रवर्गासाठी विजयभाऊ पाटील, बी. ए. पाटील, खंडेराव जाधव, तर विरोधी गटातून एल. एन. शहा, कपिल ओसवाल, विक्रम पाटील, वैभव पवार इच्छुक आहेत. ओबीसी (इतर मागास) आरक्षण पडल्यास अॅड. चिमण डांगे, आनंदराव मलगुंडे, संजय कोरे नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असतील. अजून तुरी बाजारात आहे, तोपर्यंत पालिका वर्तुळात चर्चेची मारामारी सुरू झाली आहे.इस्लामपूर शहरातील प्रभाग रचना व आरक्षण निश्चित झाले आहेत. परंतु नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाचे घोंगडे शासनाच्या दरबारात भिजत पडले आहे. आॅगस्टअखेर आरक्षण निश्चित होईल. त्या अगोदरच सत्ताधारी राष्ट्रवादीमधील काही मातब्बर नेते गुडघ्याला बाशिंग बांधून नगराध्यक्ष पदाच्या बोहल्यावर चढले आहेत.खुले पुरुष प्रवर्गासाठी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. या गटाच्या ‘सॅटेलाईट’चे प्रमुख विजय कोळेकर यांनी यापूर्वीच विजयभाऊंची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या या नाऱ्याला अॅड. चिमण डांगे, शंकर चव्हाण यांच्यासह भाऊ समर्थकांचा पाठिंबा आहे, तर विजय पाटील का, आमचे खंडेराव जाधव का चालत नाहीत, असा सवाल जाधव समर्थकांनी उपस्थित केला आहे. याउलट ओबीसी पुरुष गटासाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाले तर, विजयभाऊ चिमण डांगे यांना मदत करणार आहेत. परंतु परममित्र आनंदराव मलगुंडे नाराज होणार नाहीत, याचीही दक्षता विजयभाऊंना घ्यावी लागणार आहे.दोन भाऊंच्या राजकारणात तिसऱ्या गटाचे खंडेराव जाधव यांनीही नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपल्याच गटाला मिळण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यांच्या एन. ए. गु्रपकडे संजय कोरे हा पर्याय असेल. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये ‘बाजारात तुरी अन् नगराध्यक्ष पदाच्या चर्चेची मारामारी’ अशी अवस्था झाली आहे.सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांची अवस्था केवीलवाणी आहे. खुल्या गटासाठी एल. एन. शहा यांच्या पाठीशी काही विरोधक आहेत. तर महाडिक युवा शक्तीचे माजी नगरसेवक सतीश महाडिक यांनी आमच्याकडून एकमेव कपिल ओसवाल योग्य असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या ‘लक्ष्मीपुत्रां’ना शह देण्यासाठी कपिल ओसवाल हेच दुसरे ‘लक्ष्मीपुत्र’ असल्याचाही विरोधकांचा दावा आहे.भाजपचे विक्रम पाटील यांनी आपणही नगराध्यक्ष पदाचे दावेदार होऊ शकतो, असा दावा केला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या चर्चेचे गुऱ्हाळ आरक्षणापूर्वीच रंगले आहे.जयंतरावांच्या आशीर्वादाची गरज सध्या शहरात नवीनच चर्चेला उधाण आले आहे. नगराध्यक्ष पदासाठी खुले पुरुष आरक्षण पडले तर, विजयभाऊ पाटील आणि विरोधी गटाचे एल. एन. शहा, कपिल ओसवाल यांच्यामध्ये काट्याची टक्कर होऊ शकते. सत्ताधाऱ्यांमध्ये आमदार जयंत पाटील हीच जमेची बाजू आहे. त्यांचा ज्याच्या डोक्यावर हात असेल, तोच नगराध्यक्ष होणार आहे.
बाजारात तुरी.. त्याआधीच चर्चेची मारामारी!
By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST