अविनाश बाड-आटपाडी --इंग्रजांनी १८७६ मध्ये माणगंगा नदीवर राजेवाडी (ता. आटपाडी) येथे तलाव बांधला. इंग्रजांनी आटपाडी तालुक्यासह तलावाच्या पुढील माणगंगा नदी कोरडी ठेवून पर्यावरण हानीच्यादृष्टीने मोठा अन्याय केला. देश स्वतंत्र झाल्यानंतरही केवळ निवडणुकीच्या तोंडावरच खोटी आश्वासने देऊन अनेक पुढाऱ्यांनी फसवणूक केली. आता या तलावाच्या उजव्या कालव्याला शासन मंजुरी देणार असून, तालुक्याला आणि तालुक्याच्या हद्दीतील कोरड्या माणगंगा नदीला तब्बल १३९ वर्षांनी न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.राजेवाडी तलाव हा मध्यम प्रकल्प असून या तलावाची पाणी साठवण क्षमता १६९२ द.ल.घ.फूट एवढी आहे. सध्या या तलावाचे सिंचन व्यवस्थापन कार्यकारी अभियंता नीरा कालवा विभाग फलटण (जि. सातारा) यांच्याकडे आहे. या तलावाला डावा कालवा काढून तब्बल ४० कि.मी.पर्यंत सोलापूर जिल्ह्यात तलावातील पाणी नेण्यात आले आहे. या तलावातील पाण्यावर ४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होऊन, त्याचा लाभ व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेल्या पाटबंधारे विभागाच्या बाबूंना मिळतो. त्यामुळे प्रत्यक्षात खूप कमी क्षेत्र कागदोपत्री ओलिताखाली दाखविले जाते. या तलावातून बेकायदेशीररित्या हिंगणी, राजेवाडी, पळसवडे परिसरातील अनेक टग्यांनी जलवाहिन्या टाकून अहोरात्र अधिकाऱ्यांच्या संगनमताने पाण्याचा काळाबाजार सुरू ठेवला आहे. जगाच्या पाठीवर कुठेही, कोणत्याही नदीवर धरण बांधत असताना, पाण्याचा प्रवाह अडविल्यानंतरही नदीच्या पुढील भागाची पर्यावरण हानी होणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. नदीचे पुढचे पात्र आणि तिथल्या नदीचा परिसर ओलिताखाली राहील, अशी व्यवस्था करुन मग उर्वरित भागाला पाणी दिले जाते. पण इथे प्रत्यक्षात माणगंगा नदीच्या पुढील भाग आणि नदीचा परिसर कोरडा ठेवून डाव्या कालव्याद्वारे पाणी थेट सोलापूर जिल्ह्यात नेण्यात आले.१९७६-७७ पासून या तलावाला उजवा कालवा काढून आटपाडी तालुक्यात पाणी देण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी ८.६० कि.मी. लांबीचा कालवा खोदून आटपाडी तालुक्यातील ३६० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी ११ लाख ८८ हजार रुपये अंदाजपत्रकास शासनाने शासन निर्णय क्रमांक आयकेएस १८७४/ ३४८/ २८/ आयएमजी (२) ने दि. २९ डिसेंबर १९७७ रोजी प्रशासकीय मान्यता दिली. १९७८ मध्ये कालव्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. १९७८ ते १९८५ अखेर या कालव्यावर १८ लाख ६२ हजार रुपये खर्च करण्यात आले. तलावापासून जेमतेम एक-दोन कि.मी. कालव्याचे काम झाले. आता त्या कालव्यात आपोआप आलेले पाणी पळसावडे गावाच्या परिसरातील काही टगे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे खिसे भरुन चोरी करत आहेत. त्यानंतर आजअखेर कालव्याचे काम रखडले. भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी २०१३ मध्ये या तलावातील पाण्यावर आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्क सांगून, पाणी द्या, अन्यथा कालवा फोडण्याचा इशारा दिला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी कालवा फोडून माणगंगा नदीत पाणी सोडून दिले. त्यामुळे काही दिवस सोलापूर जिल्ह्यात जाणारे पाणी थांबवले होते. आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या कालव्याच्या कामास हिरवा कंदील दाखविला असून, पहिल्या टप्प्यात ४ कि.मी. कालवा पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे राजेवाडी तलावाचे पाणी तालुक्यात मिळण्याची आशा आहे.५...तर माणगंगा बारमाही !स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही मंजुरी मिळाल्यानंतर गेली ३८ वर्षे रखडलेला हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. गोपीचंद पडळकर यांनी त्यासाठी खा. संजय पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. आता या कालव्यातून उरमोडीचे पाणी राजेवाडी तलावात येणार आहे. ‘टेंभू’चे पाणीही माणगंगा नदीत सोडून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे नियमितपणे भरून घेतले, तर माणगंगा नक्की बारमाही होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
‘राजेवाडी’ उजव्या कालव्यास मिळणार मंजुरी
By admin | Updated: October 5, 2015 00:08 IST