पलूस : हवामानातील बदल, बिघडलेलं अर्थकारण, कृषी विभागाचे दुर्लक्ष आणि बेपर्वाई यामुळे सधन पलूस तालुक्यातील शेती अडचणीत आली आहे. ही शेती आता विकासाच्या वाटेवर आणणे एक आव्हान ठरणार आहे.अवकाळी पाऊस आणि हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे पलूस तालुक्यातील रब्बी हंगामाला दिलासा मिळाला असला तरी, तालुक्यात सुमारे ८० टक्के द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.पलूस तालुक्यात जवळपास चार हजार एकर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. पैकी २५० ते ३०० एकर क्षेत्रावरील द्राक्षबागा अवकाळी पावसाने आणि लहरी हवामानामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. पलूस तालुका हा कृषीप्रधान असून, कृष्णा खोऱ्यातील या तालुक्यात पाणी योजनांचे जाळे आहे. सकस जमीन आणि मुबलक पाणी यामुळे तालुक्यातील शेतीचा विकास झाला आहे. प्रामुख्याने ऊस, द्राक्ष, केळी, सोयाबीन, पिकांबरोबरच खरीप आणि रब्बी तसेच पालेभाज्या, फळभाज्यांचे मोठे उत्पादन घेतले जाते.मात्र अनुकूल हवामानामुळे येथील शेतकरी द्राक्ष उत्पादनाकडे वळला. द्राक्षासाठी कोरडे हवामान आवश्यक असते. तालुक्यातील हवामान काहीसे आर्द्रतायुक्त असते. तरीही येथील शेतकऱ्यांनी मोठी जोखीम पत्करून द्राक्षाच्या बागा लावल्या. मोठी भांडवली गुंतवणूक, प्रचंड जोखीम, मजूर, खते, औषधे, वीज यांची प्रचंड दरवाढ, उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारपेठांसाठी संघर्ष, दलालांकडून होणारी फसवणूक अशाही परिस्थितीत द्राक्षांचे उत्पादन घेतले. द्राक्ष उत्पादनाचा शेतकऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला, तरी शासकीय पातळीवर या शेतकऱ्यांची उपेक्षाच होत राहिली. याशिवाय प्रचंड महागाई, उत्पादन खर्चातील वाढ, उत्पादनातील घट, व्यापाऱ्यांकडून होणारी लूट, फसवणूक आदींमुळे द्राक्षशेती आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.साधारणपणे आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये द्राक्ष छाटणी घेतली जाते. मात्र काही वर्षांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे निदर्शनास येते. यावर्षी तर नोव्हेंबर महिना संपत आला तरी अवेळी झालेला पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने जवळपास ८० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अगदी मोजक्या द्राक्षबागायतदारांचा अपवाद वगळता उर्वरित बागायतदार हे कर्जबाजारी आहेत. गेल्या काही वर्षात द्राक्ष उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येते. यावर्षी तर ८० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या असून, उर्वरित २० टक्के क्षेत्रातील उत्पादकही नफ्यात येण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे द्राक्षशेती बचावासाठी शासनाच्या सहकार्याची अपेक्षा शेतकरी करीत आहेत.ढगाळ हवामान आणि पाऊस यामुळे रब्बी हंगामसुध्दा अडचणीत आला आहे. हवामानातील बदलांमुळे गहू पिकांवर तांबेरा रोग पडण्याची शक्यता आहे, तर हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र शाळू पिकाला हे हवामान अनुकूल आहे. उसासाठीसुध्दा हे हवामान पूरक आहे.तालुक्यात द्राक्षबागांसह रब्बी हंगामातील पिके अडचणीत असली तरी, कृषी विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. शासकीय योजनांचा लाभ वर्षानुवर्षे ठराविक शेतकऱ्यांनाच मिळतो आहे. (वार्ताहर)प्रशिक्षणाची गरजकृषी विद्यापीठाच्या सहलीतून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी पर्यटनावर जोर असतो. शेतकऱ्यांसाठी येणारी खते, औषधे-बियाणे कोणा कोणाला वाटली जातात, याची खातेनिहाय चौकशी झाली तर गंभीर प्रकार उघडकीस येतील. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित असून, कृषी विभागापासून दूरच आहे.
पलूस तालुक्यातील शेती व्यवसाय अडचणीत...
By admin | Updated: November 23, 2014 23:45 IST