लहान मुलांच्या आहारात पेज हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त पदार्थ मानला जातो. पचायला हलका, पटकन तयार होणारा आणि पोषणमूल्यांनी भरलेला असल्यामुळे अनेक आई-बाबा मुलांना पेज देण्याला प्राधान्य देतात. विशेष म्हणजे पेज मुलांना आवडतेही गरम खायला छान वाटते. (3 special recipes for children, make it in 5 minutes , healthy and tasty recipe )तसेच पौष्टिक असते. ३ प्रकारच्या पेज नक्की करुन पाहा.
नाचणीची पेज ही सर्वात पौष्टिक पर्यायांपैकी एक आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. पेज तयार करण्यासाठी नाचणीचं पीठ पाण्यात किंवा दुधात गाठी न होता नीट कालवून घ्यावं आणि मंद आचेवर सतत ढवळत शिजवावं. गोडासाठी त्यात गूळ घालता येतो, गोड नको असेल तर तुपावर जिऱ्याची फोडणी करा आणि त्यात थोडं मीठ घालून खारट पद्धतीने करा. ही पेज मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरते आणि शरीराला बळकटी देते. तसेच पचायला हलकी असल्यामुळे लहान मुलांसाठी योग्य आहे.
साबुदाण्याची पेज ही ऊर्जा देणारी असते. साबुदाणा आधी काही वेळ भिजवून घ्यावा आणि नंतर पाण्यात किंवा दुधात शिजवावा. तो मऊ झाला की त्यात साखर किंवा गूळ घालून पेज तयार करावी. ही पेज विशेषतः उन्हाळ्यात मुलांना दिल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि लगेच ऊर्जा मिळते. पचनासाठीही ती सोपी असल्यामुळे आजारी किंवा अशक्त मुलांसाठीही हा चांगला पर्याय आहे. जर मीठ घालून करत असाल तर त्याला तूप जिऱ्याची फोडणी द्या. गोड करत असाल तर साखर घाला. दूधही घाला.
कणकेची पेज ही रोजच्या आहारातील साधी पण खूप उपयुक्त रेसिपी आहे. मुलेच नाही तर मोठ्यांसाठीही फायद्याची आहे. तुपावर जिऱ्याची फोडणी तयार करावी. कणकेत थोडं तूप घालून ती हलकी परतून घ्यावी. त्यानंतर त्यात पाणी किंवा दूध घालून गाठी न होता नीट शिजवावं. गोडासाठी गूळ किंवा साखर घालता येते. कणकेच्या पेजेमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पोटही भरलेलं राहते. ही पेज मुलांच्या रोजच्या आहारासाठी उत्तम असून त्यांना आवश्यक कार्बोहायड्रेट्स आणि काही प्रमाणात प्रोटीनही मिळतं. गोडच नाही मीठ घालून साधीही करता येते.
अशा प्रकारे नाचणी, साबुदाणा आणि कणीक या तिन्ही पेजींचे आपापले वेगळे फायदे आहेत. नाचणी हाडांसाठी आणि ताकदीसाठी, साबुदाणा ऊर्जा आणि पोटभरीसाठी, तर कणीक रोजच्या पोषणासाठी उपयुक्त ठरते. मुलांच्या आहारात या पेजी आळीपाळीने दिल्यास त्यांना विविध पोषक घटक मिळतात आणि खाण्याचाही कंटाळा येत नाही. योग्य पद्धतीने आणि प्रेमाने तयार केलेली ही पेज मुलांच्या निरोगी वाढीसाठी नक्कीच मदत करते.
