IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
Updated:May 4, 2026 17:11 IST2026-05-04T16:34:27+5:302026-05-04T17:11:51+5:30
IAS Aastha Singh : एका सामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या आस्थाला तिच्या आजोबांनी अधिकारी बनण्याचं स्वप्न दाखवलं होतं आणि तिने तेच आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं.

‘स्वप्नांना वयाचं बंधन नसतं आणि मेहनतीला कोणताही पर्याय नसतो’ हीच गोष्ट आस्था सिंहने सिद्ध केली आहे. एका सामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या आस्थाला तिच्या आजोबांनी अधिकारी बनण्याचं स्वप्न दाखवलं होतं आणि तिने तेच आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं.
कोणतंही कोचिंग न लावता, नोकरी सांभाळत तिने UPSC ची तयारी केली. जिद्द आणि शिस्तीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवत अवघ्या २१ व्या वर्षी ती IAS अधिकारी बनली. आज तिची यशोगाथा अनेकांसाठी आदर्श बनली असून ओढ आणि दृढनिश्चय असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे तिने सिद्ध केलं आहे.
एका मुलाखतीत आस्था सिंहने सांगितलं की, ती मूळची पंजाबमधील झिरकपूरची आहे. मात्र तिचं शिक्षण वेगवेगळ्या शहरांत झालं. तिने भोपाळ आणि पंचकुला येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी ती दिल्लीला गेली.
आस्था लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती आणि तिला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाला. तिचे आजोबा नेहमी म्हणायचे की, "तू एक दिवस नक्की जिल्हाधिकारी (कलेक्टर) बनशील."
हीच गोष्ट तिच्या मनात घर करून बसली आणि हळूहळू आजोबांनी दाखवलेलं स्वप्न तिचं ध्येय बनलं. बारावी नंतरच तिने सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
आस्थाने कोणत्याही कोचिंगशिवाय यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नासाठी तिच्याकडे जास्त वेळ नव्हता, त्यामुळे तिने स्वत: अभ्यास करण्याचा मार्ग निवडला.
योग्य पुस्तकं आणि काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीने तिने आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. कॉमर्स बॅकग्राउंड असूनही तिने आत्मविश्वास गमावला नाही आणि नवीन गोष्टी शिकत ती पुढे जात राहिली.
आस्थाने सर्वप्रथम हरियाणा नागरी सेवा (HPSC HCS) परीक्षा दिली. तिने पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे तिन्ही टप्पे पार केले आणि चांगली रँक मिळवली. यामुळे तिचा आत्मविश्वास कमालीचा वाढला.
या काळात तिने यूपीएससीचा अभ्यासही सुरू ठेवला होता. नोकरीच्या ट्रेनिंगसोबत दररोज ६-७ तास अभ्यास करणं सोपं नव्हतं, तरीही तिने अभ्यासात योग्य समतोल राखला.
आस्था सिंहने यूपीएससी २०२४ च्या परीक्षेत आपल्या पहिल्याच प्रयत्नात ६१ वी रँक मिळवून IAS बनण्याचे स्वप्न पूर्ण केलं. जेव्हा ती अधिकारी बनली, तेव्हा तिचं वय अवघे २१ वर्षे होते.
या यशामुळे तिचा समावेश देशातील सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांमध्ये झाला. इतक्या कमी वयात हे मोठं यश संपादन करून तिने संदेश दिला आहे की, तुमची परिस्थिती नाही तर तुमचे प्रयत्न आणि स्वतःवरचा विश्वास तुमचं यश ठरवतं.