रत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सध्या सर्वत्र वनराई बंधारे उभारण्यात आले. या बंधाऱ्यांचे आता चांगले परिणाम दिसून येत आहेत. मात्र, या बंधाऱ्याच्या पाण्यावर भाजीपाला पिकवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात आले.यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये लवकरच पाणीटंचाई सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात पाण्याचे टँकर पुरवावे लागणार होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उन्हाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या स्थितीचा विचार करुन वनराई बंधारे, कच्चे बंधारे उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपूर्ण जिल्हाभरात लोकसहभागातून आतापर्यंत सुमारे ४,५०० बंधारे उभारण्यात आले आहेत. शासनाची दमडीही खर्च न करता श्रमदानातून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यांमुळे वाहून जाणारे लाखो लीटर्स पाणी अडविण्यात यश आले आहे. गावोगावी या पाण्यावर हिवाळ्यामध्ये भाजीपाला पिकवण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी सांगितले की, बंधाऱ्यांच्या पाण्यावर भाजीपाला पिकवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)
बंधाऱ्यांच्या पाण्यावर पिकविला भाजीपाला
By admin | Updated: December 28, 2015 00:56 IST