रहिम दलाल -रत्नागिरी-ग्रामपंचायतींना वीजबिल पेलवेनासे झाल्याने अंगणवाड्यांच्या नवीन इमारतींसाठी यापुढे सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन अंगणवाड्यांच्या वीजबिलाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत जिल्ह्यात ९० पर्यवेक्षिका, २२६२ अंगणवाड्या व ६३३ मिनी अंगणवाड्या मंजूर आहेत़ मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यात २२५० अंगणवाड्या व ५६७ मिनी अंगणवाड्या अशा एकूण २८१७ अंगणवाड्या आहेत़ जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतींना २८१७ अंगणवाड्यांच्या वीजबिलांचा भार पेलवेनासा झाला आहे़जिल्ह्यात एकाच ग्रामपंचायतीच्या हद्दीत दोन ते तीन अंगणवाड्या कार्यरत आहेत़ प्रत्येक महिन्याला महावितरणकडून वीजबिल देण्यात येते़ या अंगणवाड्यांची भरमसाठ वीजबिले येतात़ अंगणवाड्यांना ही बिले भरण्यासाठी स्वतंत्र निधी येत नाही़ त्यामुळे या अंगणवाड्यांचा भार ग्रामपंचायतींवर टाकण्यात आला आहे़ जिल्हा परिषद महिला व बालकल्याण किंवा एकात्मिक बालविकास कार्यालयाकडून या अंगणवाड्यांच्या वीजबिलांवर खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतींना दमडीही दिली जात नाही़ अनेक ग्रामपंचायतींचे उत्पन्न नसल्याने दोन-तीन अंगणवाड्यांची वीजबिले भरणा करण्यासाठी रक्कम कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ त्यामुळे अंगणवाड्यांची वीजबिले भरण्यास ग्रामपंचायती नकार देत आहेत़जिल्हा परिषदेने अंगणवाड्यांच्या नवीन इमारतींचे बांधकाम केल्यानंतर त्यांना महावितरणकडून वीजपुरवठा न घेता सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही इमारत बांधकाम करण्यापूर्वी वीजजोडणीची २५ हजार रुपयांची तरतूद करण्यात येते. हा खर्च वीज जोडणीवर न करता सौरऊर्जेसाठी करण्यात येणार आहे. सौरऊर्जेवर अंगणवाडीला वीज मिळाल्यास त्यांना वीजबिल भरण्याची कटकट कायमची संपणार आहे. त्यामुळे आता वीजबिलाचा प्रश्नही उरणार नाही. अंगणवाड्यांना नवीन इमारतींसाठी सौरऊर्जेचा पर्याय स्विकारला आहे. याद्वारे वीजबिले टळतील. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा भार कमी होणार आहे.
अंगणवाड्यांसाठी सौरऊर्जेचा वापर प्रश्न सुटणार : वीजबिलाचा भार पेलवेना
By admin | Updated: September 15, 2014 23:14 IST