देवरुख : लॉकडाऊन हे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांनाही जाचक ठरणारे असून, याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. सातत्याने होत असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी हैराण झाले आहेत. यात ठराविक दुकाने सुरू तर ठराविक बंद, याचा विचार करत देवरुखमधील क्रांती व्यापारी संघटनेतर्फे थेट मुख्यमंत्र्यांनाच निवेदनाद्वारे काही मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांच्या प्रति जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम यांनाही दिल्या आहेत. दिलेल्या या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती मार्च २०२० पासून बिकट होत चालली आहे. अत्यंत कडक लॉकडाऊन पाळूनही कोविड कमी झालेला नाही. यावरून लॉकडाऊन केल्याने कोविड नियंत्रित होत नाही, हे सिद्ध झाले आहे; तसेच लॉकडाऊनची अंमलबजावणी आम्हा व्यापाऱ्यांना मारक ठरत आहे. कोविड टेस्ट न केल्यास दुकान मालकास १० हजार रुपये दंड आकारणीलादेखील त्यांनी निवेदनाद्वारे विरोध दर्शविला आहे.
शासनाला आम्हा व्यापाऱ्यांचे पूर्ण सहकार्य असून, या व्यापारी संघटनेने ग्रीन व रेडझोन घोषित करून त्या अनुषंगाने लॉकडाऊनची तीव्रता ठरविण्यात यावी. सर्व दुकाने, आस्थापना उघडी ठेवून ग्राहकाला दुकानात घेता काउंटर सेलला परवानगी द्यावी. बाजारपेठेत ॲन्टिजन चाचणी सुविधा केंद्र उभारावे. व्यापारी संघटनांना सोडियम हायपोक्लोराईड व सॅनिटायझर देण्यात यावे. तसेच बाजारपेठांच्या प्रवेशद्वारांजवळ चौकी पहारे बसवून येणाऱ्या व्यापाऱ्यांची व ग्राहकांची तापमान व ऑक्सिजन चाचणी करावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर निखिल कोळवणकर, इस्तियाक कापडी, राजू मोरे, नितीन हेगशेट्ये, नंदकिशोर बेर्डे, उदय जागुष्टे आदी पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
चौकट
लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या तिसऱ्या दिवशी देवरुख बाजारपेठेत बऱ्यापैकी गर्दी कमी झाल्याचे दिसून आले. याबरोबरच दुपारनंतर राज्य मार्गावरही वाहतूक तुरळक झाल्याचे चित्र दिसून आले. संगमेश्वर बाजारपेठ सुरू असल्याने रत्नागिरी येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करत ही दुकाने बंद करण्याच्या सूचना येथील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यानंतर ३ वाजल्यानंतर संगमेश्वरातील सुरू असलेली दुकाने बंद करण्यात आली.