रत्नागिरी : जिल्ह्यातील लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यांना तीन तास वळवाच्या पावसाने झोडपून काढले. या वळवाने तीन बळी घेतले, तर चौघांना जखमी केले आहे. लांजा तालुक्यात रिक्षावर वडाचे झाड कोसळून सुरेखा कुरूप व उज्ज्वला खामकर या दोघी जागीच ठार झाल्या. या अपघातात महिलेसह दोघे जखमी झाले आहेत. राजापूर तालुक्यात अंगावर वीज कोसळून अक्षय गुरव हा युवक ठार झाला. यावेळी एक महिला जखमी झाली आहे. गेले काही दिवस उकाड्याने त्रस्त असलेल्या दक्षिण रत्नागिरीतील जनतेला पावसाने आज, मंगळवारी पहाटे सुखद गारवाही दिला. सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा वाटणारा पाऊस नंतर आक्रमक झाला. या पावसाने लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यांना झोडपून काढले. संगमेश्वरातील काही भागांतच हा पाऊस कोसळला. मात्र, राजापूर आणि लांजात अनेक ठिकाणी त्याने तडाखा दिला. लांजा तालुक्यातील देवधे येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका धावत्या रिक्षावर वडाचे झाड कोसळून रिक्षाचा चक्काचूर झाला. या रिक्षात बसलेल्या दोन महिला जागीच ठार झाल्या. सुरेखा राजाराम कुरूप (वय ६0), उज्ज्वला एकनाथ खामकर (५0, दोघीही रा. देवधे) अशी त्यांची नावे आहेत. झाड रिक्षाच्या मागील बाजूस पडल्याने दोघी महिला झाडाखालीच अडकून पडल्या होत्या. या दुर्घटनेत अन्य एक महिला आणि रिक्षाचालक जखमी झाले आहेत. दुसर्या एका घटनेत लांजा तालुक्यात वेरवली येथे एकाचा धरणात बुडून मृत्यू होण्याची घटना घडली आहे. राजापूर तालुक्यातही मंगळवारी प्रचंड पाऊस झाला. सोलगाव, पेंडखळे, प्र्रिंदावण, केळवली, ओणी व पाचल पूर्व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पेंडखळे परिसरात तर जोरदार विजाही चमकत होत्या. पेंडखळे येथील वठारवाडीमधील सुभाष गुरव यांच्या घराच्या बाजूला वीज कोसळून तिचा प्रचंड लोळ घरात शिरला. यामध्ये अक्षय गुरव या युवकाचा जागीच मृत्यू झाला. एक महिला यात जखमी झाली आहे. गोठ्यात बांधलेली गायही या विजेच्या धक्क्याने मरण पावली. वाडीतील अनेकजणांच्या घरांतील विजेची उपकरणे जळून खाक झाली आहे. (प्रतिनिधी)
वळवाचा तडाखा; तीन ठार, तीन जखमी
By admin | Updated: May 21, 2014 17:37 IST