मेहरून नाकाडे -रत्नागिरी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील २५ गाड्या निर्लेखित (भंगारात) काढण्यात येणार आहेत. एस. टी.चे आयुर्मान १० वर्षे निर्धारित करण्यात आले आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक काळ वापरलेल्या एस. टी.च्या १० ते १५ टक्के जुन्या गाड्या बदलण्यात येतात. गतवर्षी एकूण ७४ गाड्यांचा लिलाव करण्यात आला होता. त्यामुळे १ कोटी ४१ रूपये लिलावातून प्राप्त झाले होते. मार्चपर्यंत २५ गाड्यांचा लिलाव होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी वर्कशॉप १९६० पासून कार्यरत आहे. सुरुवातीला रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभाग संयुक्त असल्याने एकाच वर्कशॉपमधून कामकाज होत असे. मात्र, १९८०मध्ये दोन्ही विभागांची वर्कशॉप स्वतंत्र झाली व कामकाजही स्वतंत्ररित्या सुरू झाले. गिअर बदलणे, इंजिन दुरूस्ती असो वा बदलणे, रंगकाम, आसन व्यवस्था, गाडीतील विद्युतीकरण, टायर बदलणे आदी सर्व प्रकारची कामे वर्कशॉपमध्ये सुरू असतात.याशिवाय वापरात असलेल्या गाड्यांचे दरवर्षी नूतनीकरण करून आरटीओ पासिंग केले जाते. संबंधित वर्कशॉपमध्ये सर्व प्रकारची दुरूस्ती होत असल्याने वरिष्ठ अधिकारी ते कारागीरपर्यंत २०० कर्मचारी कार्यरत आहेत.रत्नागिरी विभागात एकूण ७५० गाड्यांव्दारे दररोज ९ हजार फेऱ्यांमधून एकूण २ लाख ५० हजार प्रवाशांची वाहतूक होते. दररोज २ लाख ३३ किलोमीटर इतका प्रवास होतो. त्याद्वारे महामंडळाला ६१ लाख ९ हजार रूपये दररोज सरासरी उत्पन्न मिळत आहे. एकूण ७५० गाड्यांपैकी ६० गाड्या ‘टाटा’ कंपनीच्या, तर उर्वरित ६९० गाड्या ‘लेलँड’ कंपनीच्या आहेत. टाटाच्या ६० पैकी ३२ गाड्या मिडी प्रकारच्या, तर २८ गाड्या साध्या आहेत.विभागातर्फे दरवर्षी जुन्या गाड्यांचा अहवाल पाठवण्यात येतो. शिवाय नवीन गाड्यांची मागणी करण्यात येते. त्यानुसार विभागासाठी नवीन गाड्या पुरवण्यात येतात. नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे नवीन गाड्यांची बांधणी होते. त्यामुळे गाड्यांच्या मागणीनुसार नवीन गाड्या देण्यात येतात. तीन वर्षांच्या वापरानंतर हिरकणी गाड्यांचे साध्या गाडीत रूपांतर करण्यात येते. रंग बदलण्याबरोबरच काही तांत्रिक बदलही करण्यात येतात. टाटा कंपनीच्या गाड्या साडेआठ वर्षे वापरानंतर, तर लेलँड कंपनीच्या गाड्या १० वर्षांनंतर भंगारात काढल्या जातात. गेल्या पाच वर्षांत ३७७ गाड्या भंगारात काढण्यात आल्या असून, त्यांच्या लिलावाद्वारे ३ कोटी ९८ लाख विभागास प्राप्त झाले आहेत.
एस. टी.च्या २५ गाड्या काढणार भंगारात..
By admin | Updated: February 18, 2015 23:48 IST