रत्नागिरी : रत्नागिरी येथे मच्छीमारांसाठी आयोजित कार्यशाळेत किनारपट्टीवरील मच्छीमारांचा सामाजिक व आर्थिक बाबींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेचा अहवाल शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याद्वारे किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या विकासाबाबत धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई व राष्ट्रीय शाश्वत किनारा व्यवस्थापन केंद्र, चेन्नई यांचे संयुक्त विद्यमाने ‘रत्नागिरी किनारपट्टीवरील पर्यावरण संवेदनशील भागांचा अभ्यास’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात पार पडली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राघवेंद्र पै होते. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई यांनी रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील संवेदनशील भागांचा अभ्यास नुकताच पूर्ण केला आहे. त्या अभ्यासाची सत्यता पडताळणी स्थानिक मच्छीमार बांधवांच्या सहकार्याने करण्यात आली. यावेळी मच्छीमार बांधवांनी अभ्यासात समाविष्ट असलेले मासेमारीसाठीचे नैसर्गिक स्त्रोत, तसेच मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेत नैैसर्गिक संसाधनांचा उपयोग व किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या सामाजिक व आर्थिक बाबींवर चर्चा केली. या कार्यशाळेचा अंतिम अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार असून, त्यानुसार मासेमारीच्या नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धनासाठी व किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची अपेक्षा मच्छीमारांना आहे. मच्छीमार बांधवांना विश्वासात घेऊन अहवाल तयार करून तो शासनाला सादर करण्याची केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई व मत्स्य महाविद्यालयाची ही अभिनव संकल्पना अभिनंदनीय असून, भविष्यातील संभावित वाद टाळण्यासाठी मार्गदर्शक कृती असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मच्छीमारांनी व्यक्त केली. या कार्यशाळेसाठी ज्येष्ठ मच्छीमार दादा मयेकर, अमजद बोरकर, निसार बोरकर, विष्णू पोवार यांच्यासह केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबईचे डॉ. अनंथन, डॉ. सुब्रमण्यम, राष्ट्रीय शाश्वत किनारा व्यवस्थापन केंद्र चेन्नईचे डॉ. अभिलाष आदी मान्यवरांसह बहुसंख्येने मच्छीमार बांधव उपस्थित होते. मत्स्य महाविद्यालयाचे विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. मंगेश शिरधनकर यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम केले तर प्रा. सुहास वासावे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा. भरत यादव, प्रा. श्रीकांत शारंगधर, प्रा. मकरंद शारंगधर तसेच मत्स्य विस्तार शिक्षण व मत्स्य अर्थशास्त्र पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. (प्रतिनिधी) रत्नागिरी येथे मच्छीमारासांठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबईतर्फे रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील संवेदनशील भागांचा अभ्यास पूर्ण करण्यात आला. या अभ्यासातील सर्व मुद्दे यावेळी मांडण्यात आले. या कार्यशाळेचा अहवाल तयार करताना संस्थेतर्फे मच्छीमार बांधवांना विश्वासात घेण्यात आल्याने मच्छीमार बांधवांनी या अभिनव संकल्पनेचे स्वागत केले आहे.
विकासासाठी धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा
By admin | Updated: October 15, 2016 23:23 IST