रत्नागिरी : ज्येष्ठ पुरोगामी नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांना अटक करा, नथुच्या वारसाचा धिक्कार असो, पुरोगामी विचारांवर हल्ला करणाऱ्यांचा धिक्कार असो, हिटलरशाही मुर्दाबाद, जातीयशक्ती मुर्दाबाद, अशा विविध घोषणा देत येथील फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली.महाराष्ट्रातील ज्येष्ठ परिवर्तनवादी विचारवंत अॅड. गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे प्राणघातक हल्ला झाला. दाभोलकरांच्या हत्येतून सावरत असतानाच पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे. विविध ठिकाणी सामाजिक संघटना निषेध मोर्चे काढत आहेत.आज येथील फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढून, या हल्ल्याचा निषेध करण्यात आला, हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी विलास कोळपे, विनोद वायंगणकर, श्रीवल्लभ तथा भैय्या वणजू, अभिजीत हेगशेट्ये, प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. प्रकाश नाईक, डी. के. तथा काका कुरतडकर, बी. के. पालकर, प्रसाद पाष्टे, नीलेश आखाडे, सुमित शिवलकर यांचा सहभाग होता. यावेळी शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)
पानसरेंवरील हल्ल्याचा निषेध
By admin | Updated: February 18, 2015 23:45 IST