रत्नागिरी : पावसाळा तोंडावर असल्याने कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. सध्या साठवणुकीच्या कांद्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडत असल्याने त्याचाच फायदा व्यापार्यांनी उचलला असून, १० रूपयांपासून २२ रूपयांपर्यत कांदा विकण्यात येत आहे. आठवडा बाजारात कांदा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. एप्रिलमध्ये पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या गारपिटीनंतर कांद्याच्या दरावर परिणाम झाला. ६ रूपये किलो दराने विकण्यात येणार्या कांद्याच्या दरात टप्प्याटप्याने वाढ झाली. कांद्याचे पीक नष्ट झाल्याच्या अफवा उठवून कांदा ग्रामीण भागातून ट्रकमधून विक्रीस येऊ लागला. पुढे हाच कांदा ९ रू ते १४ रूपयांच्या घरात विक्रीस उपलब्ध झाला. पावसाळ्यात कांद्याचे दर अजूनच वाढण्याच्या भीतीने कांदा खरेदीचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरीत १४ रूपये दराने विक्रीस असलेला कांदा चिपळूणात मात्र ६ ते १० रूपयांच्या घरात विकण्यात येत होता. कालपर्यत १४ ते १५ रूपयांपर्यत विक्रीस असलेल्या कांद्याचे दर शनिवारी वधारलेले होते. किरकोळ कांदा २० ते २२ रूपये किलो दराने विकण्यात येत होता. सोललेले कांदे १० रूपये दर छोटा कांदा १४ रूपये किलो दराने विकण्यात येत होता. मात्र, ठेवणीचा कांदा १७ रूपये किलो दराने विकण्यात येत होता. कालपर्यत लसूण दर ५० रूपये किलो दराने विकण्यात येत होती, मात्र आज किलो मागे १० रूपयाने दरवाढ केल्याचे दिसून येत होते. ६० रूपये किलो दराने लसूण विक्री सुरू होती. शिवाय, बटाटा २२ ते २४ रूपये किलो दराने विकण्यात येत होता. पावसाळ्यासाठी कांदा, बटाटा, लसूण खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. सध्या आगोटची खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे साठवणुकीच्या पदार्थांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. तेल ९० ते १२० रूपये लीटर, साखर ३२ रूपये, तांदूळ २० ते १०० रूपये किलो दराने विक्रीस उपलब्ध होते. गहू २३ ते ३४ रूपये किलो दराने विकण्यात येत होते. डाळी ९० ते ११० रूपयांच्या घरात उपलब्ध आहेत. कडधान्यांचेही दर वधारलेले आहेत. (प्रतिनिधी)
कांद्याने केला मोठा वांदा
By admin | Updated: May 25, 2014 01:14 IST