दापोली : ‘मी दापोली नगर पंचायतीचा बांधकाम समिती सभापती झाल्यावर आपल्याला अनेक पक्षातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या सभापतीपदाच्या निवडणुकीत सेना, भाजप व मनसे असा फॉर्म्युला दापोलीकरांना व जिल्ह्याला अनुभवायला मिळाला. पुढील वर्षी दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत हाच फार्म्युला अनुभवायला मिळाला तर नवल वाटायला नको’ असे दापोली नगरपंचायतीचे नूतन बांधकाम समिती सभापती नादीर रखांगे यांनी पत्रकारांना दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. यामुळे ही अभिनव युती म्हणजे विद्यमान आमदार विरूध्द सर्व असे असल्याची जोरदार चर्चा सध्या दापोलीत सुरू आहे. नादीर रखांगे हे तालुक्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आहेत. तसेच ते काळकाई कोंड मोहल्ला कमिटीचे उपाध्यक्षही आहेत. ते उत्तम क्रिकेटदेखील खेळतात. पहिल्यापासून समाजकार्याची आवड असल्याने आपण राजकारणात आल्याचे ते सांगतात. यापूर्वी ते दापोली नगरपंचायतीचे दोनवेळा पाणीपुरवठा सभापती होते. दापोली नगरपंचायतीच्या हद्दीत होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत आपण यापुढे कोणतीही तडजोड सहन करणार नाही. कारण ही कामे वारंवार होत नाहीत. सदर कामे दीर्घकाळ टिकावी याकरिता आपण या क्षेत्रातील जाणकार असल्याने जातीने लक्ष घालून या कामांचा दर्जा उत्तम राखण्याकरिता आग्रही राहू, असे नादीर रखांगे यांनी सांगितले. त्यांनी दापोली शहरात बांधलेल्या अनेक इमारती आज दिमाखात उभ्या आहेत. दापोली शहराबाबतच्या योजनांबद्दल बोलताना ते म्हणाले की, दापोली शहर हे चारही बाजूनी वाढत आहे. नैसर्गिक साधन सामुग्री नष्ट होऊन सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. शहरीकरण होताना हे होणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर येथील रहिवाशांना मुलभूत गरजांबरोबर उत्तम राहणीमानाकरिता विविध सुविधा देखील निर्माण केल्या पाहिजेत. याकरिता आपण सभापती असताना दापोली नगर पंचायतीच्या हद्दीत नव्याने बांधण्यात येणारी गटारे, रस्ते, नवीन इमारती याकडे आपण विशेष लक्ष पुरवणार आहोत. सध्या असणाऱ्या मलनिस्सारण पध्दतीमुळे शहरातील नदीचे गटारात रूपांतर झाले आहे. यासाठी आपण नव्याने उभ्या रहाणाऱ्या इमारतींना नियमात परवानगी देऊन त्यांच्या ड्रेनेज व्यवस्थेकडे विशेष लक्ष देणार आहोत. यामुळे नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तसेच शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या गल्ल्या, रस्ते, पदपथे आदींचा दर्जा देखील चांगला राहावा व ही कामे पुढे अनेक वर्ष टिकावी याकरिता देखील आपण वैयक्तिक लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आपण सातत्याने सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष व पक्षाच्या वरिष्ठांच्या संपर्कात आहोत. आपल्या सभापतीपदाच्या अल्प कालावधीत आपण दापोलीकरांकरिता काहीतरी अभिनव करून दाखवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रखांगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) नवी नांदी : स्थानिक पातळीवर व्यूहरचना राज्य पातळीवर विविध पक्षांमध्ये मतभेद असल्याचा अनुभव साऱ्यांनीच पाहिला आहे. मात्र, स्थानिक पातळीवर सोयीनुसार पक्ष आपली व्यूहरचना आखत असतात. त्याचा प्रत्यंतर दापोली नगरपंचायतीमध्ये पहायला मिळाला. शिवसेना, भाजप, मनसे यांची युती नवी नांदी ठरणार आहे.
नवे समीकरण नव्या राजकारणाची नांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 00:49 IST