रत्नागिरी : गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसिसचे दहा रूग्ण आढळले. त्यात रत्नागिरी तालुक्यातील सात जणांचा समावेश आहे. आतापर्यंत या रूग्णांची एकूण संख्या ५३ झाली आहे. २७६ संशयित रूग्णांवर त्वरित औषधोपचार झाल्याने ते बरे झाले आहेत. तसेच ४४८ सहवासितांना गोळ्या देण्यात आल्या आहेत. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात दहा रूग्ण आढळून आले त्यामध्ये साक्षी सचिन हुमरे (२९, आंबेरे, चिपळूण), दशरथ काशिनाथ कलगुटकर (४०, कात्रोळी, चिपळूण), अलीझा रझीम ठाकूर (दीड वर्ष, उद्यमनगर, रत्नागिरी), फातिमा रिझवान खोपकर (९, उद्यमनगर, रत्नागिरी), प्रियांका प्रदीप सावंत (२१, चांदेराई, रत्नागिरी), वसंत विनायक आंबर्डेकर (८३, कुरतडे, रत्नागिरी), दीपक मधुकर धाडवे (३३, मुचरी, संगमेश्वर), पर्शराम गोपाळ ताम्हणकर (३२, उद्यमनगर, रत्नागिरी), मुकुंद रामचंद्र मोहीत (२९, नगरपरिषद कॉलनी, रत्नागिरी), प्रकाश रामचंद्र जाधव (४०, धामणसे, रत्नागिरी) यांचा समावेश आहे.लेप्टोस्पायरोसिस हा रोग प्राण्यांच्या लघवीने दूषित झालेले पाणी अथवा माती यामध्ये काम करणारे शेतकरी यांना होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. त्वचेवर जखमा झालेल्या असल्यास हा रोग होतो.जास्त पावसामुळेही हा रोग होतो. या रोगाचे जंतू रक्तवाहिन्या व पेशींवर प्रभाव पाडतात. तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी (मुख्यत: पायांचे व मांड्यांचे स्नायू), थंडी वाजणे, काविळ, रक्तस्त्राव, डोळे सुजणे, मुत्रपिंडाचे, यकृताचे काम बंद पडून मृत्यूही ओढवू शकतो. बऱ्याच वेळा रूग्णांची लक्षणे किरकोळ व समजून न येणारी असतात. योग्य काळजी घेतल्यास या आजारापासून संरक्षण होऊ शकते. यासाठी दूषित पाणी, माती किंवा भाज्या, मानवी संपर्क टाळावा. दूषित पाण्याशी संपर्क ठेवणे अपरिहार्य असल्यास रबरबूट, हातमोजे वापरावेत. या आजाराचा रोगी आढळल्यास त्याची तत्काळ माहिती द्यावी. शेतामध्ये काम करणारे शेतकरी तसेच प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती यांनी त्यांना जखम झाली असल्यास त्यावर त्वरित ड्रेसिंग करून घ्यावे. घुशी व उंदीर यांचा नायनाट करावा. नमूद केलेल्या लक्षणांचा रूग्ण आढळल्यास त्वरित रूग्णालयामध्ये जाऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
तीन दिवसांत लेप्टोच्या दहा रूग्णांची वाढ
By admin | Updated: September 16, 2014 23:22 IST