लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : वर्षभरासाठी लागणारे तिखट अथवा मसाला घरोघरी तयार करण्यात येतो. सध्या घरोघरी मिरची खरेदी करणे, वाळविणे, दळण काढून आणणे, याची लगबग सुरू आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत मसाल्यासाठी लागणारी मिरची व मसाल्याच्या अन्य जिन्नसाच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. लाल मिरचीच्या किमतीत शंभर रुपयांनी वाढ झाली आहे.
तिखटासाठी लवंगी, तर रंगासाठी काश्मिरी मिरचीचा वापर केला जातो. मात्र, दरामुळे एकाच प्रकारची मिरची खरेदी न करता, बजेटप्रमाणे मिश्र मिरचीची खरेदी करण्यात येत आहे. वर्षभरासाठी लागणाऱ्या तिखटाचा अंदाज असल्याने त्याप्रमाणे मिरची खरेदी सुरू असली तरी वाढत्या दरामुळे खरेदीच्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनामुळे गतवर्षी लॉकडाऊन मार्चमध्ये झाले होते. त्यामुळे कित्येकांना मसाले बनविता आले नव्हते. कोरोना रूग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन होण्याची भीती असल्यामुळेच गृहिणींची मिरची खरेदीबरोबर तिखट दळून आणण्याची लगबग सुरू असल्याने मसाल्याची गिरण, डंकावर नंबर लागत आहेत. महागाईने पोळलेल्या ग्राहकांना मिरची व मसाल्याच्या जिन्नसाची दरवाढ सोसावी लागत आहे.
कोल्हापुरातून आवक
- जिल्ह्यात विक्रीसाठी येणारी मिरची, मसाल्याचे अन्य साहित्य कोल्हापूर तसेच नवी मुंबई येथून विक्रीसाठी येत आहे.
- घाऊक बाजारात गुजरातमधून मिरचीची आवक होत आहे
- स्थानिक शेतकरी मिरचीचे उत्पादन घेऊ लागले असले तरी या मिरच्यांचा वापर अद्याप तरी वाळवणांसाठी होत नाही.
वर्षभरासाठी लागणारे तिखट एकदाच तयार केले जाते. मिरचीच्या दरात तसेच मसाल्यासाठी लागणाऱ्या अन्य जिन्नसाचे दरही कडाडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत शंभर रुपयांनी घसघशीत वाढ झाली आहे. महागाईने आधीच जीव मेटाकुटीस आणला आहे. प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ अद्याप सुरू आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे खर्चाला कोठे कात्री लावावी, हा प्रश्न आहे. यावर्षी इंधनाच्या दरात झालेल्या दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होत असल्याने शासनाने महागाईवर कुठेतरी निर्बंध आणणे गरजेचे आहे.
- दुर्वा रसाळ, गृहिणी
महागाईचा दर निश्चित करताना सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे. महागाई सातत्याने वाढत असली तरी मजुरीचे दर मात्र सतत वाढत नाहीत. जीवनाश्यक वस्तूंमध्ये डाळी, तेल, कडधान्य, तांदूळ, गव्हाचे दर आधीच वाढलेले आहेत. कांद्याचे दर आता खाली येऊ लागले आहेत. मात्र, मसाल्यांचे दर चांगलेच भडकले आहेत. पोटाला चिमटे काढून जमवलेली पूंजी लॉकडाऊन काळात संपली. आता लॉकडाऊन झाले तर आर्थिक परिस्थिती विचित्र होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा विचार करूनच दरवाढ करणे आवश्यक आहे.
- शिल्पा जोशी, गृहिणी