प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे गणेशभक्त व पर्यटकांचे आकर्षण बनले असून, गेल्या तीन ते चार वर्षांपासून पश्चिम बंगालमधील पर्यटकांना गणपतीपुळेची भुरळ पडल्याचे चित्र आहे. यावर्षीही पश्चिम बंगालमधील विशेषत: कोलकातामधील शेकडो पर्यटकांनी आॅक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांत गणपतीपुळे पर्यटनस्थळाला भेट दिली असून, महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाने त्यांच्या निवासाची चांगली व्यवस्था केली. आता पुणे, मुंबईचे पर्यटक गणपतीपुळेत येत आहेत. महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पर्यटन विकासासाठी अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे राज्याबाहेरील व परदेशातील पर्यटकही रत्नागिरीकडे आकर्षित होत आहेत. रत्नागिरीजवळच असलेल्या गणपतीपुळे येथे अत्यंत मनोहारी सागर किनारा असून, या किनार्यावरच श्री गणपतीचे जागृत मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून अनेकजण या गणपतीला नवस बोेलतात व नंतर येऊन नवस फेडतातही. त्यामुळे गणपतीपुळेचे जसे राज्यातील लोकांना आकर्षण आहे तसेच ते राज्याबाहेरील लोकांनाही आहे. पश्चिम बंगालमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबरदरम्यान प्रतिवर्षी देवी उत्सव असतो. या काळात शाळांनाही सुट्या असतात. त्यामुळे या काळात तेथील लोक आता महाराष्टÑातील गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी येतात. त्यामुळे एमटीडीसीही या पर्यटकांना चांगल्या सुुविधा देण्यासाठी सज्ज आहे. गेल्या ३१ मार्चपर्यंत गणपतीपुळे येथील एमटीडीसीच्या निवास व्यवस्थेचा पश्चिम बंगाल व राज्यातील ३९४६५ पर्यटकांनी, तर विदेशातील २३४ पर्यटकांनी लाभ घेतला, अशी माहिती पर्यटन विकास महामंडळाच्या सुत्रांनी दिली. गणपतीपुळे येथे एमटीडीसीचे ११२ सूटस (निवासी रुम्स) असून, त्यातील ८ रुम्सच्या दुरुस्ती काम सुरू आहे. ४० कोकणी हाऊसपैकी १५ हाऊस फुल्ल आहेत. ११२ पैकी ८५ सूटस वापरात असून, या सूटसना पर्यटकांकडून चांगली मागणी आहे. एमटीडीसीच्या रुम्स वातानुकुुलित व बिगर वातानुुकुलित अशा दोन्ही प्रकारातील असून, वातानुकुलित रुम्सना सध्या अधिक मागणी आहे. जानेवारी ते एप्रिलदरम्यान या रुम्सना चांगली मागणी होती. मे महिन्यातही ३१ मेपर्यंत ८० ते ९० टक्के रुम्स बुक आहेत. (प्रतिनिधी)
गणपतीपुळेची ‘मोहिनी’ पश्चिम बंगालवर पर्यटकांचा ओढा
By admin | Updated: May 24, 2014 01:15 IST