रत्नागिरी : जिल्ह्यात टंचाईग्रस्त १५ गावामध्ये ३६ वाड्यांची भर पडली आहे. या टंचाईग्रस्तांना करण्यात येणारा पाणीपुरवठा केवळ १४ टँकर्स करण्यात येत असून तो अपुरा असल्याने जनता हैराण झाली आहे. मात्र गतवर्षी पावसाचे प्रमाण जास्त होते तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे यंदा पाणीटंचाई कमी आहे. डोंगरदर्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. कारण या वाड्यावस्त्या डोंगरदर्यामध्ये असल्याने पाण्याची पातळी खालावल्यामुळे येथील विहीरी, विंधन विहीरी, ओढे, झरे आटल्याने रहिवाशांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे़ मागील आठवड्यामध्ये ४१ गावातील ६७ वाड्यांमध्ये पाणीटंचाई होती. या टंचाईग्रस्तांना ६ शासकीय आणि ८ खासगी टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत होता़ यामध्ये १५ गावातील ३६ वाड्यांची भर पडली आहे़ मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात टंचाईग्रस्तांची संख्या वाढलेली असतानाही केवळ २ टँकरची वाढ करण्यात आली आहे. दापोलीमध्ये १ गाव ९ वाड्या, संगमेश्वरमध्ये ९ गावातील १३ वाड्या, लांजात ५ वाड्या व राजापूरात ३ गावातील ५ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. तर रत्नागिरी तालुक्यातही यावेळी पाणीटंचाई सुरु झाली असून २ गावातील ४ वाड्यांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे प्रमाण खूप कमी आहे. कारण जिल्ह्यात ठिकठिकाणी अवेळी पाऊस पडत असल्याने त्याचे परिणाम पाण्याच्या पातळीवर झाला आहे. पावसाचे पाणी झिरपल्याने पाण्याची पातळी जैसे थे राहत आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील मंडणगड, गुहागर, चिपळूण या तालुक्यांमध्ये पाण्याच्या पातळीची स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे तीनही तालुके अजूनही टंचाईमुक्त आहेत. (शहर वार्ताहर)
टंचाईग्रस्त वाड्यांचे शतक पाणीटंचाई : १०३ वाड्यांची तहान भागेना...
By admin | Updated: May 11, 2014 00:09 IST