संजय सुर्वे ल्ल शिरगाव रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील पूर्वीच्या स्वराज्य काळातील मोरे घराण्याचा संबंध अगदी छत्रपती शिवाजी काळापासून आहे. मात्र, याच मोरे घराण्याचे समज-गैरसमज पसरल्याची खंत सध्याच्या पिढीला लागून राहिली आहे. नेमका हाच गैरसमज दूर करण्याचा एक प्रयत्न आता मोरे घराण्याने सुरु केला असून, त्यांचे संदर्भ त्यांनी दिले आहेत. मोरे घराण्याने इतिहासकालीन संदर्भ घेऊन नवीन पुस्तक लिहिले आहे. यात त्यांनी दिलेल्या संदर्भात असे नमूद केले आहे की, राजकीय वैमनस्यातून रघुनाथपंत सबनीस व संभाजी कावजी बांदा या शिवरायांच्या शिलेदारांच्या हस्ते १६५६ मध्ये दौलतराव मोरे यांचे दत्तक पुत्र कृष्णराव मोरे (शेवटचे चंद्रराव) तसेच हनमंतराव व सूर्याजीराव यांचा घातपाताने अंत झाला. त्यानंतर राजगादीचे वारस कृष्णाजीराव व बाजीराव यांचा क्रूरपणे शिरच्छेद केला गेला, असे बखरीत नोंद आहे. जावळी (सातारा जिल्ह्यातील प्रांत) राजसत्ता संपुष्टात आल्यानंतर मोरे कुळवंशाने छत्रपतींच्या निर्वाणानंतरच्या काळातही स्वराज्याच्या रक्षणार्थ रक्त सांडले. मात्र, आपले १६० वर्षांचे राज्य वाचविण्यासाठी चंद्रराव मोरे घराण्याने छत्रपती शिवरायांना विरोध केला. हीच घटना सातत्याने काही इतिहास लेखकांनी पुढे आणली. परंतु, वास्तव कधीच समोर आणले नाही. मुळातच दूरवर गेलेली मोरे मंडळी कधी एकत्र आली नाहीत, अशी दोनशे पन्नास वर्षे निघून गेली. अवघ्या भारतभरात आपल्या क्षत्रिय लढाऊ बाण्याने ज्यांनी आपले स्थान निर्माण केले, त्यांनी कालांतराने शिवाजी महाराजांसोबत व निवार्णानंतरही स्वराज्य रक्षणार्थ शौर्य गाजविले आहे. हा घटनाक्रम आजपर्यंत कोठेच आला नसल्याची मोरे यांची खंत आहे. १९६० साली मोरे एकत्र आणण्याचा प्रयत्न जुन्याजाणत्या मोरेनी केला. पण, एकत्र येण्यास भौगोलिक स्थिती कारणीभूत ठरुन अडचणी आल्या. अलिकडच्या पाच वर्षांत मात्र कुलस्वामिनी निरीपजी देवीच्या भक्तीने मोरे परिवारांची २५ गावे उचाट (कांदाटी) येथे एकत्र आली. ज्या ३६०० एकर प्रांतात मोरे पूर्वजांनी शौर्य गाजवले. त्याच डोंगरमय परिसरात विस्तीर्ण रहाटाने वेढलेल्या ठिकाणी श्री देवी निरीपजीचे मंदिर जीर्णोद्धाराचा कार्यक्रम करुन प्रतिवर्षी वर्धापन दिन व त्रैवार्षिक गोंधळाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. स्वराज्य स्थापनेच्यावेळी दूरवर गेलेले मोरे आणि कोयना प्रकल्पाने कांदाटी खोर्यातून दूरवर पाठवलेले मोरे अशी दोन वेळा या परिसरातून परांगदा होण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण जसे नदीचा मूळ प्रवाह शोधला जातो तसाच कुळाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करत एक एक मोरे पुन्हा जावळी प्रांतात उचाट येथे येत आहेत. मंदिराजवळ भक्त निवास बांधले जात आहे. जुन्या जाणत्या मोरेंनी जंगलात फिरुन आपल्या चारशे वर्षांपूर्वीच्या शौर्याच्या पाऊलखुणा शोधल्या. चंद्रराव मोरेंचा वाडा जिथे होता, तिथे स्मृतिस्तंभ उभारुन 'ऐतिहासिक संदर्भा'सह माहिती दिली आहे. आगामी 'आम्ही मोरे जावळीचे' या पुस्तकातून अवघ्या भारतभर विखुरलेले मोरे कुलदेवता निरीपजी देवीच्या आशीर्वादाने एकत्र येतील, अशी मोरे कुटुंबियांची आशा आहे. खरा इतिहास मांडत भविष्याचा वेध घेतील, अशी अपेक्षा सुरेश मोरे, अरविंद मोरे, विनायक मोरे, किशोर मोरे, संजय मोरे, रमेश मोरे यांनी व्यक्त केली आहे.
गैरसमज नको शौर्य जाणा! मोरे घराण्याचा प्रयत्न : पुस्तकातून मांडणार खरा इतिहास
By admin | Updated: May 18, 2014 00:32 IST