चिपळूण : तालुक्यातील धामणवणे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील सावंत यांनी प्रभाग क्रमांक २ मध्ये विविध विकासकामांना प्रारंभ केला आहे. सार्वजनिक विहिरीवरील झाकण बसविणे, शिवगणवाडी येथील अंगणवाडीची संरक्षक भिंत बांधणे आदी कामांचा प्रारंभ नुकताच सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
तंटामुक्त समितीची सभा
दापोली : तालुक्यातील पालगड येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीची सभा ग्रामपंचायतीच्या सभागृहात तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अविनाश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी समितीकडे आलेल्या दोन अर्जांचे वाचन ग्रामविकास अधिकारी जगन्ना झोडपे यांनी केले.
कांद्याची आवक वाढली
रत्नागिरी : शहरात तसेच परिसरात कांदा आणि बटाटे घेऊन बाहेरील जिल्ह्यातील विक्रेते मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. रस्त्यालगत यांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कांदा आणि बटाटा दोन्ही वस्तूंचे दर कमी असल्याने नागरिकांकडून खरेदीला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबईकर दाखल
मंडणगड : तालुक्यात शिमगोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरीही मुुंबईकर कुटुंबीयांसमवेत गावी आले आहेत. काही अजून गावी येत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमधून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
निवृत्तिवेतन रखडले
रत्नागिरी : जिल्हा परिषद, पंचायत समिती या कार्यालयामधून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, खातेप्रमुख, कर्मचारी यांना अजूनही निवृत्तिवेतन मिळालेले नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून निवृत्तिवेतनापासून या सेवानिवृत्तांचा लढा सुरू आहे. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला निवृत्तिवेतन देण्याचे शासनाचे आदेश केवळ कागदावरच आहेत.
काँग्रेसची सभा
दापोली : येथील तालुका काँग्रेस पक्षाची सभा जिल्हाध्यक्ष अॅड. विजय भोसले आणि जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या सभेत पक्षवाढीसाठी चर्चा करून प्रत्येकासाठी जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या. कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून ही सभा झाली.
पालखी यात्रा रद्द
चिपळूण : तालुक्यातील दहिवली बुद्रुक आणि खुर्द या दोन्ही गावांच्या पालखी भेटीनिमित्त २९ मार्च रोजी यात्रा आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या अनुषंगाने ग्रामस्थांनी तातडीने बैठक घेऊन ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शासन नियमांचे पालन करून पालखी भेटीचा सोहळा होणार आहे.
चित्रकला स्पर्धा
रत्नागिरी : मराठा मंडळातर्फे कोरोनाच्या अनुषंगाने ‘माझा परिवार, माझी जबाबदारी’ या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ही स्पर्धा होणार असून ८ वी ते ११ वी आणि खुला गट अशा दोन गटांत स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन होत आहे.
प्रशिक्षण शुल्क लाभ
रत्नागिरी : आयटीआयमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिकूलतेचा लाभ दिला जाणार आहे. पीपीई योजनेंतर्गत प्रवेश घेणाऱ्या तसेच खासगी आयटीआयमध्ये शिल्प कारागीर प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २८,८०० रुपयांपर्यंत हा लाभ दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडे संपर्क करावा.
शेतकरी भाजावळीत व्यग्र
गुहागर : सध्या तालुक्यातील शेतकरी भाजावळीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतले आहेत. जमीन साफ करून त्यावर शेणी, कवळाचे भारे त्यावर पालापाचोळा पसरून भाजावळ केली जात आहे. बहुतांश भागातील शेतकरी सध्या भाजावळीमध्ये गुुंतले आहेत. त्यामुळे संपूर्ण दिवस शेतीत जाऊ लागला आहे.