चिपळूण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये बुद्धधम्माची दीक्षा घेतली. विशिष्ट जातीचा समावेश असलेल्या देशभरातील लाखो अनुयायांनी या धम्माची दीक्षा घेतली. पूर्वीच्या काळी बुद्धविहारे विरळ होती. आता प्रत्येक गावात एक तरी बुद्धविहार पाहायला मिळते. चिपळूण तालुक्यातील पाग - बौद्धवाडी येथे बांधण्यात आलेल्या बुद्धविहाराची स्वच्छता गेल्या दहा वर्षांपासून सामूहिक पद्धतीने केली जात आहे. घर म्हटल की स्वच्छता आली. घराबरोबरच परिसराची स्वच्छता व्हायला हवी. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून संत गाडगेबाबांनी स्वत: झाडू हातात घेतला आणि स्वच्छतेचे महत्त्व सर्वधर्मीय समाजबांधवांना पटवून दिले. स्वच्छतेमुळे आरोग्यही निरोगी राहाते. राज्य शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु केले. त्याचे अनुकरण आजही काही ठिकाणी केले जात असल्याचे चित्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा घेतल्यानंतर या धम्माचे अनुकरण करणाऱ्या समाज बांधवांनी पिंपळाच्या झाडाखाली पूजा पाठ करण्यास प्रारंभ केला. पाग - बौद्धवाडी येथे जुना पिंपळ असून, येथे धार्मिक कार्यक्रमही केले जात असत. हे सारे घडत असताना एखादे बुद्धविहार असावे, अशी संकल्पना जुन्या जाणत्या कार्यकर्त्याच्या मनात आली. सामुहिकपणे पागेवरील बुध्दविहाराची स्वच्छता करण्यात येत असल्याबद्दल अनेकांनी या मंडळींचे अभिनंदन केले. बुद्धविहार बांधण्यासाठी दानशूर व प्रतिष्ठित व्यक्ती प्रत्येक घरातील मंडळींच्या हातून आर्थिक मदत जमा करुन आॅक्टोबर २००४ मध्ये बुद्धविहाराची संकल्पना पूर्णत्त्वास गेली. इमारत उभी राहिल्याने विविध धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी जागाही उपलब्ध झाली. मात्र, या विहाराची स्वच्छता झाली तरच या विहाराचे पावित्र्य अबाधित राहील. या विचारातून वाडीतील प्रत्येक घरातील व्यक्तींकडे स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली. आळीपाळीने दररोज या विहाराची साफसफाई केली जात असून, पूजापाठही घेतला जात आहे. गेली दहा वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरु असून, याचा आदर्श अन्य गावांनी घेण्यासारखा आहे. (वार्ताहर)
सामूहिकपणे होतेय बुध्दविहाराची स्वच्छता
By admin | Updated: September 18, 2014 23:22 IST