लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महापूर ओसरून आज दोन महिने उलटले तरी त्याचे परिणाम चिपळूणकरांना अजूनही भोगावे लागत आहेत. पुरासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आल्याने वाशिष्ठी नदी गढूळ झाली. त्यानंतर आजतागायत ही परिस्थिती कायम आहे. परिणामी या नदीवरील नगर परिषद व अन्य ग्रामपंचायतींच्या पाणी योजनेतून गढूळ पाणीपुरवठा होत असून, शहरातील अनेक हॉटेलमध्येही तीच परिस्थिती असल्याने ग्राहकांसह नागरिक हैराण झाले आहेत.
येथे २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुराने चिपळूणकरांची दयनीय अवस्था केली. या महापुरात अवघे चिपळूण शहर उद्ध्वस्त झाले. या प्रसंगातून चिपळूणकर आजही सावरलेले नाहीत. महापुरामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांमध्ये गढूळ पाण्याची समस्या डोकेदुखी बनली आहे. अतिवृष्टीत कोयना धरणापासून कोळकेवाडी धरणाकडे येणाऱ्या जलप्रवाहात डोंगराचा मोठा भाग खचल्याने तेथील माती मोठ्या प्रमाणात वाशिष्ठी नदीला वाहून आली. गाळाचे हे प्रमाण इतके होते की शहरातील बहुतांशी रस्ते गाळात रुतले होते. पूर ओसरल्यानंतरही केवळ गाळामुळे काही गावांचा व वाडी वस्तीचा संपर्क काही दिवस तुटला होता. त्यातच बहुतांशी भागातील शेतीचे गाळामुळे अस्तित्वच संपून गेले आहे.
अजूनही अनेक ठिकाणी गाळ साचलेला असून पावसासोबत तो थेट नदीपात्रात वाहून येतो. पूर ओसरल्यानंतरही सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथील वाशिष्ठी नदीचे पाणी आजही गढूळ आहे. त्यामुळे नदीवर अवलंबून असलेल्या पाणी योजनांनाही गढूळ पाणीपुरवठा होत आहे. विशेषतः नगर परिषदेच्या दोन्ही जॅकवेल वाशिष्ठी नदीवर असून, या पाणी योजनेलाही गढूळ पाणीपुरवठा होत आहे. काही योजनांचे पंपहाऊस गाळामुळे निकामी झाले. अजूनही काही योजनांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. याच पद्धतीने अनेक हॉटेलमधील कुलर व शुद्धीकरण केंद्र निकामी झाल्याने अनेक ठिकाणी गढूळ पाणी ग्राहकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढली आहे.
.................
...तर धोका वाढला असता!
महापूर ओसरल्यानंतर काही तासांतच रत्नागिरी, जयगड, अलिबाग व अन्य भागांतील अनेक सामाजिक संस्था पाण्याच्या बाटल्या घेऊन दाखल झाले. त्यानंतर किमान पंधरा दिवस सातत्याने पाण्याचा पुरवठा केला जात होता. लाखोंच्या संख्येने बाटल्या पुरविण्यात आल्या. त्यामुळे या कालावधीत साथीच्या रोगांवर नियंत्रण राहिले. मात्र, आता पाण्याच्या बाटल्या पुरवल्या जात नसल्याने त्याचा परिणाम दिसू लागला आहे. शहरासह लगतच्या गावांमध्येही डेंग्यू, मलेरिया व अन्य साथीचे रुग्ण आढळून येत आहेत.