मंडणगड : निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील ६७ अंगणवाड्यांच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. आजही नुकसानग्रस्त इमारती त्या अवस्थेतच असून, या इमारतींच्या दुरुस्तीकरिता शासनाकडून एकही रुपयांचा निधी मंजूर न झाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. नुकसानग्रस्त इमारतींची दुरुस्ती न झाल्यास लहान बालकांना बसावायचे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात एकूण १६६ अंगणवाडी आहेत. त्यापैकी ६७ अंगणवाड्यांना स्वमालकीच्या इमारती आहेत, तर उर्वरित ९९ अंगणवाड्या या समाजमंदिरे, खासगी जागा व शाळांच्या इमारतीमध्ये भरवण्यात येतात.
शून्य ते सहा वर्षे वयोगटातील सुमारे ३,५९४ बालके अंगणवाड्यांतून शिक्षण घेतात. निसर्ग चक्रीवादळात अंगणवाडी इमारतींचे छप्पर, पत्रे उडाले तर काही ठिकाणी इमारती मोडल्या. त्याचे पंचनामे करण्यात आले असून, दुरुस्तीचा अहवाल महिला व बालकल्याण विभाग रत्नागिरी यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती प्रभारी अधिकारी व पर्यवेक्षिका एस. मालोंडकर यांच्याकडून प्राप्त झाली आहे. तसेच वेळोवेळी होणाऱ्या सभांमध्येही अंगणवाड्यांच्या नुकसानीची बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त अंगणवाड्या आजही त्याच अवस्थेत आहेत.
पाच वर्षांपासून प्रकल्प अधिकारी पद रिक्त
तालुक्यातील मोठ्या अंगणवाड्या ११९ असून १०६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत, तर १३ पदे रिक्त आहेत तसेच मदतनीसांची १०१ पदे कार्यरत असून १८ पदे रिक्त आहेत. ४७ मिनी अंगणवाड्यातील ९ पदे रिक्त आहेत. तालुक्याण्या महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयात ५ सुपरवायझर पदे मंजूर असून यापैकी २ पदे रिक्त आहेत, तर प्रकल्प अधिकाऱ्यांचे पद गेली पाच वर्षे रिक्त असून प्रभारींच्या माध्यमातून या पदाचा कार्यभार चालविला जात आहे.