चिपळूण : येथील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिरतर्फे गेली ८५ वर्षे अखंडपणे सुरु असलेल्या श्रीकृष्ण व्याख्यानमालेत यावर्षी नामवंत वक्ते उपस्थित राहणार आहेत. ही व्याख्यानमाला रविवार, ३० आॅगस्ट ते ४ सप्टेंबर या दरम्यान चालणार आहे. दि. ३० रोजी डॉ. आसावरी बापट यांचे आपली पुराणे, आपले विज्ञान या विषयावर व्याख्यान होणार आहे. गीत रामायणाला यावर्षी ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त दि. ३१ रोजी नामवंत गायक राजाभाऊ शेंबेकर यांचा गीतरामायणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक धनंजय चितळे करणार आहेत. दि. १ सप्टेंबर रोजी संघ युगाचा शालीवाहन डॉ. हेडगेवार या विषयावर दादा इदाते विचार मांडणार आहेत. हे वर्ष डॉ. हेडगेवार यांच्या जन्माचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आज जगातील ५०हून अधिक देशात संघ कार्याचा विस्तार झाला आहे. याचे बिजारोपण डॉ. हेडगेवार यांनी केले. या व्याख्यानात त्यांच्या जीवन चरित्राचा मागोवा इदाते घेणार आहेत.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माला १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ. आंबेडकर यांनी राज्य घटना लिहून या देशात नवी आधुनिक स्मृती दिली. शोषित वंचितांना आत्मभान दिले. विश्वरत्न डॉ. आंबेडकर या विषयावर दि. २ रोजी रमेश पतंगे विचार व्यक्त करणार आहेत. लोकमान्य टिळकांच्या गीतरहस्य ग्रंथाला १०० वर्षे पूर्ण झाली. ‘सीदन्ती मम गात्राणि’ हतबल झालेल्या अर्जुनाला युध्दप्रवण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने भगवतगीता सांगितली. इंग्रजांच्या वरवंट्याखाली हतवीर्य झालेल्या समाजाला कर्मयोग शिकवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहिले. टिळकांचे गीतारहस्य या विषयावर दि. ३ रोजी धनंजय चितळे यांचे व्याख्यान होणार आहे. यावर्षीच्या व्याख्यान मालेतील शेवटचे पुष्प सागर देशपांडे गुंफणार आहेत. आज विज्ञान युग आहे. बदल हा विश्वाचा स्थायीभाव आहे. या बदलात महाराष्ट्र येतो. बदलता महाराष्ट्र या विषयावर ४ रोजी सागर देशपांडे विचार व्यक्त करणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव लक्ष्मी नारायण देवस्थानच्या सरपंच प्रमिला दाबके, सेके्रटरी किशोर फडके यांनी केले आहे. (वार्ताहर)
चिपळुणात ३० पासून श्रीकृष्ण व्याख्यानमाला
By admin | Updated: August 10, 2015 00:40 IST