- सिकंदर अनवारे, दासगाव
महाड औद्योगिक वसाहतीतील टेमघर गावातील हद्दीत गुरुवारी भंगार अड्ड्यावर अग्निकांड झाले. भंगार म्हणजे लोखंड, पत्रा, प्लास्टीक आदि टाकाऊ वस्तू असे पकडले तर ही आग खूप क्षुल्लक ठरते. मात्र सुमारे पाच तासांपेक्षा जास्त वेळ सातत्याने पाणी मारल्यानंतर देखील आटोक्यात न येणाऱ्या या भंगार गोदामाच्या आगीमध्ये नक्की काय जळतेय? हा प्रश्न निर्माण होत आहे. अग्निकांड होत असताना छोटे-मोठे आठ स्फोट आणि सॉलवंडसारख्या ज्वालाग्रही रसायनांचा साठा भंगार अड्ड्यावर असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. महाड औद्योगिक वसाहतीत टाकाऊ पदार्थ म्हणून अनेक कारखान्यातून भंगारात मोठ्या प्रमाणात ज्वालाग्रही सॉलवंड टाकले जाते. प्लास्टीक आणि लोखंडी ड्रममधून कारखानदार हे वेस्ट सॉलवंड भंगारवाल्यांना देत असतात. कोणतेही टँकर अगर लांब वाहतुकीकरिता १२,००० लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणात सॉलवंड जमा करण्याची गरज असते. यासाठी हे भंगार व्यावसायिक कारखान्यातून उचललेले सॉलवंड अनधिकृतरीत्या गोदामात साठवतात. मात्र ते उष्णतेच्या अथवा ठिणगीच्या संपर्कात आल्यास पेट घेत असल्याचे गुरुवारी टेमघरच्या घटनेतून समोर आले आहे. निळ्या आणि लाल रंगाचा निघणारा ज्वालाग्रही पदार्थामुळे आग भडकत गेली. याप्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. रहिवासी वस्ती आणि शाळेलगत असलेल्या या भंगार अड्ड्यामध्ये अग्नी कांडाचा तपास गांभीर्याने होणे गरजेचे आहे. दुपारी ३ वाजता लागलेली आग रात्री ८ ते ९ पर्यंत विझली नव्हती.तपास योग्य दिशेने गरजेचेतीन वर्षांपूर्वी महाड औद्योगिक वसाहतीतील हितकरी या कारखान्यातील टाकाऊ कार्पेटला आग लागली होती. त्यावेळी ९ ते १० कि.मी.पर्यंत अग्नीमुळे काजळी पसरली होती. ४८ तासांपेक्षा जास्त काळ या दुर्घटना स्थळावर पाणी मारण्याचे काम सुरु होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने टाकाऊ कार्पेटची विल्हेवाट लावणेसंदर्भात दिलेल्या नोटिशीनंतर लागलेल्या आगीची गंभीर दखल औद्योगिक पोलिसांनी आजपर्यंत घेतलेली नाही. आणि हे प्रकरण पुढे जाऊन अकस्मात घटना या नावानेच बंद झाले.अशाच प्रकारे दोन वर्षांपूर्वी आॅगस्ट महिन्यात एका भंगार अड्ड्यावर वायुगळती होऊन ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. महाड औद्योगिक वसाहतीने आॅगस्ट २०१५ मध्ये औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सर्व भंगार व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याबाबत नोटिशी बजावल्या होत्या. मात्र त्यानंतर अधिकाऱ्यांना या नोटिशीचा विसर पडल्याने भंगार व्यावसायिकांचे फावले आहे. याठिकाणी देशमुख कांबळे, बिरवाडी टॉकी कोंड, बिरवाडी आदर्शनगर, बिरवाडी कुंभार वाडा औद्योगिक वसाहतीतील रहिवासी क्षेत्र असलेल्या स्टेट बँक मागील भंगार व्यवसाय, राजेवाडी फाटा येथील भंगार व्यवसाय, टेमघर आणि जीते या दोन गावालगत आजही अनधिकृतपणे भंगार व्यवसाय सुरू आहेत. ग्रामपंचायतीवर कारवाईची गरजकाही दिवसांपूर्वी कोंडिवते येथील भंगार व्यावसायिकामुळे ग्रामपंचायत पाणीपुरवठ्यामध्ये रासायनिक पाणी शिरले होते. गुरवारी टेमघर येथील घडलेली घटना अशा दुर्घटना लक्षात घेता ज्या गाव हद्दीमध्ये रसायन हाताळणारे भंगार व्यावसायिक कार्यरत आहेत अशा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि सरपंचावर कारवाईचे प्रस्ताव दाखल होणे गरजेचे आहे. औद्योगिक क्षेत्रात रसायनाबाबत खुलासा करणारे तांत्रिक अधिकारी कार्यरत असतात, मात्र असे कोणतेच अधिकारी ग्रामपंचायत पातळीवर उपलब्ध नसल्याने घातक रसायन हाताळणाऱ्या भंगारवाल्यांना ना हरकत देणे हा गुन्हा आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ अगर संबंधित विभागाने ग्रामपंचायतीच्या विरोधात कारवाईची ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. भंगार व्यावसायिकांवर कारवाईचे अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाड कार्यालयाला नव्हते. मात्र भंगारामुळे होणारे अपघात आणि प्रदूषणानंतर विभागीय कार्यालयाने रसायन हाताळणी प्रकरणी भंगार व्यावसायिकांवर कारवाईचे अधिकार दिले आहेत. यापुढे कारखान्याप्रमाणे भंगार व्यवसाय देखील प्रदूषण नियंत्रणाच्या कक्षेत असेल. - अमित लाटे, क्षेत्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ महाडमहाड औद्योगिक वसाहतीत बेकायदेशीरपणे रसायनांचा साठा आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. - नंदकुमार सस्ते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महाड औद्योगिक पोलीस ठाणे