खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ८ वॉर्डातील २, ४, ५ व ६ या वॉर्डातून तीन वॉर्ड महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवार, २१ जुलैला चिठ्ठ्या टाकण्यात येणार आहेत. कोणता वॉर्ड आरक्षित होणार या संदर्भात नागरिकांना उत्सुकता लागली आहे. कॅन्टोन्मेंट निवडणूक कायदा २००६ सेक्शन (१२) (१) नुुसार खडकी बोर्ड वर्ग एकमध्ये आहे. कॅन्टोन्मेंट निवडणूक कायदा नियम २००७ नुसार बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर अनुराग भसिन यांच्या हस्ते महिला आरक्षणाची चिठ्ठी काढण्यात येणार आहे. गेल्या निवडणुकीत वॉर्ड ३, ७ व ८ महिलांसाठी राखीव होता. वॉर्ड १ अनुसूचित जाती (एस. सी.) वर्गासाठी राखीव केला गेला आहे. हे चार वॉर्ड वगळून उर्वरित २,४,५ व ६ या चार वॉर्डातून महिला आरक्षणाच्या चिठ्ठा जाहीरपणे सर्वांसमोर काढण्यात येणार आहेत. या पद्धतीने तीन वॉर्ड निश्चित केले जातील. यातील एक व उर्वरित तीन वॉर्ड खुल्या वर्गासाठी असतील. आरक्षित महिलांचे तीन वॉर्ड संरक्षण मंत्रालयाकडे अध्यादेशासाठी पाठविले जातील. चिठ्ठी काढण्याची प्रक्रिया बोर्ड कार्यालयात सकाळी साडेअकराला होणार आहे. या वेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)
महिला वॉर्ड आरक्षण २१ जुलैला
By admin | Updated: July 14, 2014 04:56 IST