वाघोली : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेला परवानगी दिली नाही, तर गणपती विसर्जन करणार नसल्याचा निर्णय वाघोलीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतला आहे. डीजेला परवानगी मिळावी, याकरिता पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार असल्याचे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव रुजू झाल्यापासून लोणीकंद पोलिसांच्या हद्दीमध्ये डीजे वाजविण्यास पोलिसांकडून परवानगी दिली जात नसल्यामुळे डीजे बंद आहेत. लग्न समारंभ, गणेशोत्सव मिरवणुकीत वाघोलीसह इतर २७ गावांमध्ये डीजे वाजला नाही. गेल्या वर्षी काही तरुणांनी डीजेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली. यंदा परवानगी दिली नाही, तर कठोर भूमिका घेण्याचे ठरविण्यात आले.याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये सर्वच मंडळांनी पोलिसांच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. पुणे शहर व जिल्ह्यात डीजे सर्रासपणे वाजविला जात आहे. परंतु वाघोली परिसरात बंद असल्यामुळे तरुणांचा उत्साह संपला असल्याचे मत सर्वांनीच मांडले. या वर्षी पोलिसांनी परवानगी दिली नाही, तर गणपती विसर्जनच करणार नसल्याची ठाम भूमिका या वेळी उपस्थित सर्वच मंडळांनी घेतली आहे. नियम व अटी घालून डीजेला परवानगी मिळावी, याकरिता पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना भेटून परवानगी मिळण्यासाठी बुधवारी वाघोलीतील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. या वेळी वाघोली, आव्हाळवाडी, केसनंद, कोलवडी परिसरातील मंडळांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
...तर गणपती विसर्जन करणार नाही!
By admin | Updated: September 2, 2015 04:24 IST