लसीकरण अंतिम टप्प्यात
बारामती: हिवाळ्यामध्ये लाळ्या खुरकूत रोगामुळे पशूपालक चिंतेत असतात. दुधाळ जनावरांना हा रोग झाल्यास दूध उत्पादन क्षमता घटल्याने शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. बारामती तालुक्यात पशूसंवर्धन विभागाच्या वतीने १ लाख ४ हजार जनावरांपैकी ८६ हजार ५०० जनावरांना लाळ्या खुरकूतची लस देण्यात आली आहे. लसीकरणामुळे तालुक्यात लाळ्या खुरकूत नियंत्रणात आला आहे.
आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लाळ्या खुरकूत या आजाराची सुरवात होते. हा आजार जून महिन्यापर्यंत दिसून येतो; या रोगाचा संक्रमण काळ दोन ते १२ दिवस आहे. आजारी जनावरास ताप येतो व तोंडामध्ये, खुरांच्या बेचक्यात व कासेवर फोड येतात. या फोडांमुळे जनावर तोंडातून सारखी लाळ गाळते. कालांतराने हे फोड फुटल्यानंतर तेथे जखमा तयार होतात. जिभेवरील वरचा थर पूर्णपणे सोलपटून निघतो. यामुळे जनावर अन्न, पाणी वर्ज्य करते. साहजिकच अधिक थकवा येऊन रूक्षपणा जाणवतो. खुरावरही अशा प्रकारचे फोड येत असल्याने जनावो चालतानां लंगडतात. नवजात वासरांना या रोगाची लागण झाल्यास मृत्यूचे प्रमाण ९० ते ९२ टक्के असू शकते. वेळीच उपचाराने ही मर घटवणे शक्य आहे. जिवाणूंच्या दुय्यम संक्रमणामुळे इतर संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण होऊ शकतो. कासेवर फोड येऊन नंतर फुटल्यामुळे कासदाह होतो. लाळ्या खुरकूत रोगामध्ये गाभण जनावरांचे गर्भपात होण्याचा धोका देखील असतो.
प्रतिबंधात्मक उपाय...
- वर्षातून दोन वेळेस लाळ्या खुरकूत रोगाची लस टोचून घ्यावी.
- आजारी जनावरांना त्वरित वेगळ्या ठिकाणी बांधून त्यांचा इतर चांगल्या
जनावरांशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
- ऊसतोड करणाऱ्या कामगारांची जनावरे बऱ्याच ठिकाणी फिरल्यामुळे आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरवतात, त्यामुळे अशा जनावरांना जाणीवपूर्वक लसीकरण करणे महत्त्वाचे आहे.
- नवजात वासरांना लाळ्या खुरकूतग्रस्त मातेपासून दूर ठेवावे व दूध
पिण्यास प्रतिबंध करावा.
बारामती तालुक्यामध्ये लाळ्या खुरकूत लसीकरणा सोबतच लंपी स्किन
प्रतिबंधात्मक लसीकरणा सुरू आहे. सध्या बारामती तालुक्यात लाळ्या
खुरकुतचे लसीकरण अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही लसीकरणामध्ये २१ दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. २१ दिवसांनतर राहिलेल्या जनावरांना लंपी स्किन तर लंपी स्किनची लस दिलेल्या जनावरांना लाळ्या खुरकूतची सल देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या दोन्ही रोगांचे गांभिर्य ओळखून आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. आर. आर. पाटील, तालुका पशूसंवर्धन अधिकारी
-----
बारामती तालुक्यातील लसीकरणाची आकडेवारी
रोग जनावरांना शिल्लक डोस डोस दिलेले डोस देण्यात येणारी जनावरे
लंपी
स्किन २७,१४७ १०,००० ७६,८५३
लाळ्या
खुरकुत ८६,५०० १२,००० १७,५००
-----------------------------------------