मंगेश पांडे ल्ल पिंपरीश्री संत तुकाराममहाराजांचा वैकुंठगमन सोहळा म्हणजेच तुकाराम बीज. हा सोहळा शनिवारी (दि. ७) श्रीक्षेत्र देहू येथे होणार आहे. तुकोबारायांवरील भक्तीमुळे या सोहळ्याची व्यापकता वाढत आहे. दळणवळणाच्या सुविधेमुळे भाविकांची संख्या वाढली आहे. ३६७ वर्षांपूर्वी फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबारायांचे वैकुंठगमन झाले. दुपारी बाराला बीजदिनी इंद्रायणी नदीतीरावरील वैकुंठस्थान येथे नांदुरकीच्या वृक्षाची पाने सळसळतात, अशी नागरिकांची भावना आहे. दुपारी बाराला कीर्तनाचा समारोप होतो अन् वृक्षावर पुष्पवृष्टी झाल्यानंतर बीज सोहळा पार पडतो. हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अडीच ते तीन लाख भाविक देहूत येतात. देहू भक्तिरसात डुंबून जाते. मुख्य बीज सोहळ्यासह द्वितीया ते अष्टमी अशा सहा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी पूर्वी दूर अंतरावरील भाविक पायी अथवा बैलगाडीने देहूत यायचे. हा सोहळा सहा दिवस सोहळा चालायचा. आता तो तीन तासांतच पार पडतो. वैकुंठगमन सोहळा पार पडताच भाविक परतीच्या मार्गाला निघतात. त्यामुळे दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत गर्दी ओसरते. एसटी, पीएमपी बससह, रेल्वे, तसेच खासगी वाहने उपलब्ध झाल्याने सोहळ्यासाठी येणाऱ्यांना सोईचे झाले आहे. पीएमपी व एसटी महामंडळाकडून जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या जातात. मानाच्या दिंड्या, तसेच काही वारकरी अष्टमीनंतरच माघारी फिरतात. एकाच वेळी लाखो भाविक इंद्रायणीतीरी दाखल होत असल्याने पूर्वी जागा अपुरी पडायची. आता रस्तारुंदीकरण, तसेच नदीतीरावरील घाटाचे काम केल्याने वैकुंठस्थानमंदिर परिसरही प्रशस्त झाला. तीर्थक्षेत्र विकास आराखडयातील प्रामुख्याने सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्पांचे काम पूर्ण झालेले नाही. यासाठी शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. ४यात्रा काळात ग्रामपंचायत प्रशासनाकडून रस्त्याकडेची, तसेच मंदिरासमोरील दुकाने हटविण्यात येतात. यामुळे विक्रेते व प्रशासन यांच्यातील वाद ठरलेले आहेत. वर्षानुवर्षे या ठिकाणी व्यवसाय करणारे व्यावसायिक शासन अथवा संस्थानाने गाळे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करीत आहेत. ४तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरणासाठी स्वत:हून मिळकती हटविणाऱ्या बाधित मिळकतधारकांना मोबदल्याची पहिल्या टप्प्यातील रक्कम देण्यात आली. मात्र, दोन वर्षे उलटूनही दुसऱ्या टप्प्यातील रक्कम मिळकतधारकांच्या हातात पडलेली नाही. या विकास आराखड्यात महत्त्वाचे प्रकल्प राबविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बीजसोहळा, तसेच पालखी प्रस्थान सोहळ्यासह इतर दिवशी देहूत येणाऱ्या मंत्रिमहोदयांनी देहूतील प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ठायी ठायी तुकोबाराय!
By admin | Updated: March 7, 2015 00:40 IST