पुणे : शहरातील कोरोनाबाधितांची वाढ कायम असून, सोमवारचा अपवाद वगळता रविवारनंतर आज (मंगळवार) नव्या कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा ३०० च्या वर गेला आहे़ आज दिवसभरात ३०९ रूग्ण आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ११़ ७९ टक्क्यांवर गेली आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसातपर्यंत २ हजार ६२० पर्यंत संशयितांची तपासणी करण्यात आली़ गेल्या काही दिवसांपासून शहरातील पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारी ही सातत्याने वाढत असून, ४ टक्क्यांपर्यंत खाली आलेली पॉझिटिव्हची टक्केवारी ही सद्यस्थितीला सरासरी १० टक्क्यांच्यापुढे गेली आहे़
मंगळवारी २७२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये १४२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत़ तर आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २७२ इतकी असून, शहरातील सक्रिय रूग्णसंख्या १ हजार ७१९ इतकी आहेत. आज दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला असून, २ जण पुण्याबाहेरील आहे़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ८०२ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख ७६ हजार ८११ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९५ हजार ४९६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८८ हजार ९७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================