पिंपरी : पाश्चात्त्य पद्धतीने व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यापेक्षा सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने आकुर्डीतील प्रयत्न सोशल फाउंडेशनतर्फे दर वर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर घेण्यात आले. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजाशी एकरूपता राखण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी खास प्रयत्न करावे लागत नाहीत. असेच समाजाप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्यातील काही तरुणांनी वेगळी वाट तयार केली आहे. वेगवेगळ््या क्षेत्रात काम करत असलेली, परंतु एकाच ध्येयाने प्रेरित असलेली ही १०-१२ युवकांची संघशक्ती वाखणण्याजोगी आहे.प्रतीक भोसले, विशाल कुदळे, राजेश गवळी, प्रमोद यादव, अमोल मोडक, प्रफुल्ल इंगळे, सचिन सावंत, आनंद घाटवलकर, संदीप साप्ते, योगेश प्रसाद हे तरुण दर रविवारी भेटतात. प्रत्येक सदस्याकडून विशिष्ट रक्कम जमा करतात आणि त्यातूनच समाजासाठी समाजोपयोगी कामे केली जातात. त्यात वृक्षारोपण, श्रमदान, भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, स्वच्छता मोहीम, अनाथाश्रम-वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करणे, समाजोपयोगी विषयावर व्याख्याने, शिबिरे आयोजित करणे या प्रकारची कामे केली जातात. त्यांनी भोसरीतील यशवंतराव चव्हाण आश्रमशाळेतील मुलांना गणवेश दिले आहेत. तर, मावळातील शांता येवले यांच्या ‘आभाळमाया’ या मुलींच्या संस्थेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.फाउंडेशनचे सदस्य प्रशांत भोसले म्हणाले, ‘‘लाल रंग जसा प्रेमाचा, तसाच रक्ताचादेखील आहे. म्हणून हा दिवस रक्तदानाने साजरा करतो.’’(प्रतिनिधी)
सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न
By admin | Updated: February 17, 2016 00:47 IST