पुणे : आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनतर्फे (एआयसीटीई) महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना कोणतीही आडकाठी न करता अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांपेक्षा प्रवेश पूर्व परीक्षा देऊन महाविद्यालयातील प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. यंदा त्यात आणखी घट होणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. परिणामी, २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सुमारे ६५ हजारांहून अधिक जागा रिक्त राहणार आहेत.गेल्या वर्षी राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सुमारे १ लाख ६५ हजार जागांसाठी केवळ १ लाख ६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला. त्यामुळे मागील वर्षी सुमारे ५८ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यातच पुणे विभागांतर्गत येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या तीन विद्यापीठांमधील २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात १७ हजार ३५७ जागा रिक्त राहिल्या होत्या. तर, २0१४-१५ या शैक्षणिक वर्षात २५ हजार ७५ जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा राज्यातून जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी, पुणे विभागातून अभियांत्रिकी अभ्यासक्रमास घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३0 हजारांपर्यंत घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. गजानन खराटे म्हणाले, की यंदा जेईई परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे ५0 हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशावर त्याचा निश्चितच परिणाम झालेला दिसेल. गेल्या वर्षी ५८ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या.त्यामुळे यंदा ६0 ते ६५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे यंदा इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) या दोन संस्थांमधील प्रवेशासाठी एकाच पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. परिणामी, राज्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाशिवाय वेगळा सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यार्थी मिळणे अवघड होणार आहे. (प्रतिनिधी)गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहणार आहेत. परंतु, अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थी मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर आणि त्यानंतर सिव्हील शाखेला पसंती देतील. केंद्र व राज्य शासनाने उद्योग व रोजगार वाढीसाठी धोरण निश्चित करण्याचा विचार केला आहे. परंतु,अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पुढील दोन ते तीन वर्षांत शासकीय धोरणांनुसार बदल झाले, तर अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल.- डॉ. अनिल सहस्रबुद्धे, संचालक, कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे.४मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दोन ते तीन वर्षे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर २0 ते २५ हजार रुपयांची नोकरी मिळावी, या उद्देशाने विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेत आहे.४अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहणार असल्या, तरी यंदा विद्यार्थी प्रथम मॅकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि आयटीला प्राधान्य देताना दिसून येतील.
अभियांत्रिकीकडेही पाठ
By admin | Updated: May 19, 2015 23:54 IST