नारायणगाव : नारायणगाव परिसरात एकाच रात्रीत पाच दुकाने फोडणाऱ्या अट्टल पाच चोरटयांना पकडण्यात नारायणगाव पोलीसांना यश मिळाले असून पकडण्यात आलेले चोरटे हे निगडी येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या चोरटयांमध्ये तीन आरोपी अल्पवयीन वयाचे आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक पद्मभुषण गायकवाड यांनी दिली. सुजित भिवा गायकवाड (वय २०), सुधीर लाला कांबळे (वय २२) दोघेही रा.संजयनगर, ओटा स्कीम निगडी यांना पोलीसांनी अटक केली असून या दोघांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर टोळीतील अन्य तीन आरोपी बालगुन्हेगार असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या संदर्भात गायकवाड यांनी दिलेल्या माहीतीनुसार, पकडण्यात आलेल्या चोरटयांनी ३ जून रोजी नारायणगाव परिसरातील भन्साळी सेल्स कार्पोरेशन, ओंकार शॉपी, प्रशांत परिमीट रूम, ग्रामवैभव बिल्डींग मधील गोकुळ भागवत यांची मोबईल शॉपी व अन्य एक दुकान अशी एकूण पाच दुकानांचे शटर उचकटून सुमारे ६० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. प्रवीण भन्साळी यांचा लॅपटॉप, मोबाईलची चोरी केली होती. आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. लॅपटॉपच्या पासवर्ड शोधण्यासाठी आरोपी निगडी येथील एका व्यापाऱ्याकडे गेला होता. त्याची माहिती त्या व्यापाऱ्याने पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात, पोलीस उपनिरीक्षक पद्मभूषण गायवाकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून निगडी येथून पाच जणांना ताब्यात घेतले. विषेश म्हणजे हे चोरटे कोणत्याही साहित्याचा वापर न करता केवळ हाताच्या साहयाने दुकानाचे शटर उचकटण्यात माहीर होते. या आरोपींनी आतापर्यंत अशा चोरीचे ५२ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (वार्ताहर)
दुकाने फोडणाऱ्या चोरट्यांना अटक
By admin | Updated: June 23, 2014 01:32 IST