पुणे : तडजोडजन्य, किरकोळ प्रकरणांमध्ये तातडीने सामोपचार होऊन खटला निकाली काढण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ‘मध्यस्थी’ केंद्रे गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत दिसत आहेत. यामुळे पक्षकारांमध्ये मध्यस्थी हा उपक्रम सुरू आहे की बंद, याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, मध्यस्थीसाठी आलेल्या पक्षकारांना बंद केंद्रे व न्यायाकक्षांच्या माहितीअभावी वैतागून परतावे लागत आहे. न्यायालयावरील खटल्यांचा वाढता बोजा कमी करण्यासाठी व पक्षकारांना तत्काळ न्याय मिळावा यासाठी राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ‘मध्यस्थी’ हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये प्रामुख्याने पती-पत्नींतील भांडणे घटस्फोट, पोटगीचे प्रश्न, धनादेश न वटल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. अनेकदा पक्षकार आपापसांत भांडणे मिटवतात, तडजोडही होते; मात्र दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे न्यायालयाची वारी चुकत नाही. यात पक्षकारांचा वेळ, आयुष्यही खर्ची जाते त्यामुळे मध्यस्थी या न्यायालयीन प्रक्रियेतून असे खटले निकाली काढण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी शिवाजीनगर न्यायालयात स्वतंत्र मध्यस्थी केंद्र आहे. शिवाजीनगर न्यायालयात न्यायाधीश व वकील असे एकूण ३८ जण नेमण्यात आलेले आहेत. मात्र, सध्या या खोल्या बंदच असतात. मध्यस्थीसाठी पक्षकार आल्यास खोल्यांमध्ये बैठकव्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छता नाही. अशा परिस्थितीत पक्षकारांचे समुपदेशन कसे करणार, असा वकिलांना प्रश्न पडत आहे. येथे पूर्वी शिपाई असायचा, कोणत्या दिवशी कोणती प्रकरणे व कोणते न्यायाधीश-वकील मध्यस्थी म्हणून आहेत याचे नियोजन त्याकडे असायचे; त्यामुळे पक्षकारांची गैरसोय टळायची.
शिवाजीनगर न्यायालयातील ‘मध्यस्थी केंद्र’ बंद अवस्थेत
By admin | Updated: September 1, 2014 05:10 IST