अमोल जायभाये, पिंपरीपूर्वप्राथमिक वर्गासाठी पालक रात्र रात्र जागून शाळांच्या बाहेर रांग लावतात. ठरावीक शाळेमध्ये पाल्यास प्रवेश मिळावा, यासाठी पालक हरतऱ्हेने प्रयत्न करतो. प्रसंगी अधिक डोनेशन देण्यास तयार होतात. पाल्यासोबत पालकांची मुलाखत घेणे, भरमसाट डोनेशन आदी प्रकारामुळे प्रवेशाचा मार्ग अधिक किचकट, गुंतागुंतीचा आणि त्रासदायक होत आहे. त्यातच काही शाळांनी पालकांची आर्थिक कुवत तपासण्याचा नवा फंडा शोधला असून, पालकांनी पेमेंटस्लिप प्रवेशअर्जासोबत जोडावी, असा फतवा काढला आहे.पूर्वप्राथमिक शाळा प्रवेशासाठी नियमावली पाळली जात नाही. यासाठी सगळे नियम शाळा ठरवत असल्याने पालकांची धावपळ होत आहे. शाळा प्रशासन यामध्ये मनमानी पद्धतीने कारभार करीत असतानाही त्याला लगाम घालण्यासाठी सरकार उदासीन असल्याचे दिसून येत आहे. पूर्वप्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी व वयाची निश्चिती करण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या हालचाली झाल्या आहेत. मात्र, नियमित भेडसावणारा प्रवेशाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याच प्रकारची उपायोजना करण्यात येत नाही, ही मोठी शोकांतिकाच आहे. प्रवेशासाठी मनमानी पद्धतीने रक्कम आकारतात. याकडेही शासन डोळेझाक करीत आहे. शहरातील काही इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेशअर्ज वाटपावरून गोंधळाचे प्रकार घडले आहेत. प्रत्येक शाळा मनमानी पद्धतीने अर्ज वाटपाची तारीख ठरवत आहेत. अर्जवाटपाची तारीख आधी जाहीर केली जात नाही. सगळ्या शाळांची तारीख समजण्यासाठी काहीच यंत्रणा नाही. शाळांची तारीख समजण्यासाठी प्रत्येक शाळेत हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे पालकांचा वेळ नाहक वाया जात आहे. त्यांना मोठा त्रासही सहन करावा लागतो. परिसरानुसार शाळा आपले शुल्क ठरवत आहेत. प्रत्येक ठिकाणी कमी-जास्त शुल्क आकारले जात आहेत. मूल लहान असल्याने जवळच्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी पालक आग्रही असतात. त्यामुळे कितीही शुल्क असले, तरी त्यांना ते भरावेच लागते. शुल्क भरण्यासाठीही रांग असतेच. शाळेने पालकांच्या मुलाखती घेणे, त्यांची आर्थिक पात्रता तपासणे यापेक्षा मुलांच्या गुणवत्तेवर अधिक भर देण्याची गरज आहे. विद्यार्थी घडविण्यावर अधिक भर दिला गेला पाहिजे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत शुल्क आणि अमाप पैसा कसा गोळा करता येईल, यासाठी वेगवेगळे तंत्रच शाळा वापरत आहेत. अनेक ठिकाणी पालकांनी गोंधळही केला आहे. मात्र, ते तेवढ्या प्रमाणात होते. त्यानंतर सगळेच विसरून जातात. पालकही याचा पाठपुरावा करीत नाही. शहरामध्ये पालक संघटित होत नसल्याने शाळा मनमानी करताना दिसून येतात. पालकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी शासकीय स्तरावर या शाळेच्या प्रवेशासाठी समितीची स्थापना करावी. या समितीच्या माध्यमातून सर्व शाळांवर वचक निर्माण केला जाण्याची गरज आहे. त्याचबरोबर प्रवेशाचे निकष काय, हेही ठरवले गेले पाहिजेत. शहरातील सगळ्या शाळांचे प्रवेश एकाच वेळी होतील. त्यांच्या संकेतस्थळावर याद्या टाकाव्यात. महाविद्यालयात प्रवेश घेताना राबवण्यात येणारी संकेतस्थळाची योजना येथे ही अमलात येणे गरजेचे आहे. रात्रभर जागून प्रवेश घ्यावा लागतो. त्यानंतर पैसे भरण्यासाठी सुद्धा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बँकेमध्ये चलन भरण्याची सुविधा निर्माण करून हे प्रवेश अधिक सुलभ व पालकांसाठी सोपे करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी शासन स्तरावर हलचाली होण्याची गरज आहे, अशी मागणी पालक वर्ग करीत आहे.
आर्थिक कुवत तपासण्याची ‘शाळा’
By admin | Updated: January 31, 2015 01:00 IST