वाघोली : मांजरी-वाघोली रोडवर दुचाकी आडवी लावून कोयत्याचा धाक दाखवून मारहाण व लूटमार करणाऱ्या एकास लोणी कंद पोलीस गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
अभिजित ऊर्फ अभ्या महादेव कांबळे (वय २६, रा. मांजरी बुद्रुक) असे लूटमार प्रकरणी अटक केलेल्याचे नाव आहे.
मांजरी-वाघोली रोडवर शुक्रवारी (दि.२९) रात्री पावणेदहाच्या सुमारास गजानन ढगे यांच्या चारचाकीला अभिजित कांबळे याने दुचाकी आडवी मारली. त्याने दगड व कोयत्याने चारचाकीच्या काचा फोडून गणेश ढवळे यांच्यावर कोयत्याने मारहाण करून जखमी केले. ढगे यांच्या खिशातील चावी, मोबाईल जबरदस्तीने नेला. याप्रकरणी फिर्यादीनुसार फरार झालेल्या कांबळे यास कुमार बिल्डर्स बांधकाम साईटवर सापळा रचून लोणी कंद पोलिसांच्या गुन्हे शोधपथकाने अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बजाज कंपनीची डिस्कव्हर दुचाकी जप्त केलेली आहे. अभिजित कांबळे हा रेकॉर्डवरील असून त्याचेवर यापूर्वी देखील लोणी कंद, हडपसर पोलीस ठाणे येथे चोरी व जबरी चोरीचे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.