पुणे : शहरात दररोज दीड हजार टनांवर निर्माण होत असलेला कचरा कोठे टाकायचा, हा प्रश्न महापालिकेसमोर उभा आहे. ग्रामीण भागात जागा शोधल्या जात आहेत; परंतु तेथील ग्रामस्थांचा विरोध आहे. उरुळी देवाची-फुरसुंगीच्या एका आंदोलनाने संपूर्ण शहराला कचऱ्याच्या ढिगात लोटले. त्यामुळे दुसऱ्याच्या दारात टाकण्यापेक्षा परिसरात निर्माण झालेला कचरा तेथेच जिरविण्याचे प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. गेल्या दशकभरात शहराची झपाट्याने होणारी वाढ, वाढती लोकसंख्या, तसेच या लोकसंख्येच्या तुलनेत दर वर्षी सरासरी २० ते ३० टक्क्यांनी वाढणाऱ्या कचऱ्याच्या बोजाची स्थिती पाहता भविष्यात ही कचराकोंडी कायम राहणार आहे. २००७ मध्ये शहरात दर वर्षी अवघा ७५० टन कचरा निर्माण होत होता. या कचऱ्याचे प्रमाण २०१३ मध्ये १५०० ते १६०० टनांवर पोहोचलेले आहेत. सद्या या निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रियेत पालिकेस यश येत असले, तरी २०२५ पर्यंत शहराची लोकसंख्या ५० लाखाच्यावर पोहोचण्याची शक्यता असून, कचरानिर्मिती ३ ते ४ हजार टनांच्या घरात पोहोचेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील कचऱ्याच्या प्रकल्पांसाठी जागा मिळविताना येणाऱ्या अडचणी, प्रकल्पांना असणारा स्थानिक नागरिकांचा विरोध पाहता कचरा परिसरातच जिरविणे गरजेचे आहे.
दुसऱ्याच्या दारात टाकण्यापेक्षा परिसरातच जिरवा कचरा
By admin | Updated: August 12, 2014 03:48 IST