बेनझीर जमादार, पुणेएकाच घरात तीन ते चार जण राहतात, कोणाला वडिलांनी, तर कोणाला पैशांसाठी स्वत: नवऱ्याने विकलेली, कोणी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी इच्छा नसतानी ही देहविक्री करण्यास भाग पडलेल्या या महिलांनी पै-पै करून साठविलेला पैसा कधी घरमालकीण फसवणूक करून घेते, तर कधी पोलीस धमक्या देऊन लुबाडून घेतात. अशा या देहविक्री करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांची माहिती असणाऱ्या व हे जीवन स्वत: अनुभवणाऱ्या याच महिलांनी देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी स्वत:ची ओळख मिळावी व सर्व सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी कम्युनिटी बेस्ट आर्गनायझेशन ही संस्था स्थापन केली.ही संस्था २०१२ पासून कार्यरत असून या संस्थेमध्ये सध्या बाराशे सदस्य आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळावी यासाठी त्यांचे पोस्ट सेवा, एलआयसी, बचत गट, बॅँक खाते उघडून दिले जाते. तसेच, सामाजिक सुरक्षिततेसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनकार्ड व विविध सरकारी योजना मिळवून देण्याचादेखील प्रयत्न या महिला करत असतात. काही अडचण आल्यास त्यांना कायदेविषयक मदतदेखील केली जाते. तसेच या महिला या व्यवसायातून मुक्त होऊन स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्या यासाठी ‘आव्हान थ्री’ या उपक्रमांतर्गत या संस्थेच्या माध्यमातून या महिलांना शिक्षण, ब्युटीपार्लर, फॅशनडिझायनिंग, शिवणकाम, केटरिंग व संगणक प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत देहविक्री करणाऱ्या पाचशे महिलांना बॅँक खाते, चारशे महिलांना पॅनकार्ड, तर तीनशे ते चारशे महिलांना आधार कार्ड, संजय गांधी निराधार योजना मिळवून दिल्या असून, सध्या आम आदमी सुरक्षा विमा योजनेचे फॉर्म एकशे दहा महिलांना भरून दिले आहेत, अशी माहिती संस्थेचे मॅनेजर सागर बोंडे यांनी दिली.-----------देहविक्री करणाऱ्या महिलांकडे मुख्य प्रवाहाच्या बाहेरील महिला याच नजरेतून पाहण्याची समाजाची दृष्टी असते, पण काही जण तर त्यांच्या वाऱ्यालाही उभ्या राहत नाही. परंतु त्याही समाजाचा घटक आहे. त्यांनाही मूलभूत सोईसुविधा मिळाव्या, यासाठी मार्गदर्शन करण्याची खूप इच्छा होती म्हणून वेश्या व्यवसाय सोडून या महिलांना न्याय मिळावा, तसेच त्यांना त्यांची ओळख मिळावी, यासाठी प्रयत्न करते.- रमादेवी रामशेट्टी , कम्युनिटी बेस्ट, आर्गनायझेशन, अध्यक्ष-----------काही देहविक्री महिलांना बाहेर पडण्याची तळमळ असते. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना शिक्षणाचे धडेदेखील गिरवतो, हा अनुभव खरंच खूप छान आहे.तसेच पार्लरच्या माध्यमातून एका दिवसात तुम्ही किती उत्पन्न मिळवू शकता व या व्यवसायातून किती मिळते, अशी तुलना करून त्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवतो. आशाप्रकारे यातून दोन ते तीन महिला मुक्त होऊन स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. - शिक्षिका, लीना खांडेकर------------देहविक्री करणाऱ्या महिलांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी पाच महिलांचे गट तयार केले आहेत. या महिला प्रत्येक वाड्यात जाऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व, आर्थिक सुरक्षिततेचे महत्त्व, या व्यवसायाच्या बाहेर पडून बाहेरही सुंदर जग तुमची वाट पाहत आहे. या गोष्टीचे महत्त्व पटवून देतो. परंतु हे सर्व करताना काही वेळेला त्यांच्या शिवीगाळ, त्यांचे रागविणे सहन करावे लागते; पण हे सर्व सहन करून त्यांच्यासोबत मैत्रीचे नाते वाढवून त्यांच्यामध्ये जागृती करण्याचे प्रयत्न चालू ठेवतो.प्रियंका टाक, खजिनदार
देहविक्री करणाऱ्या महिलांना संरक्षण
By admin | Updated: July 7, 2015 04:44 IST