पुणे : पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष मुकुंदराव अनगळ (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि. १६) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. चाळीस वर्षांच्या कार्यकाळात अनगळ यांनी ग्रंथालयाचे कार्यकारिणी सदस्य, कार्यवाह, कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करून ग्रंथालय नावारूपाला आणले.
सुमारे चाळीस वर्षे रोज ग्रंथालयात येऊन काम करणाऱ्या अनगळ यांचे आजारपणामुळे ग्रंथालयात येणे कमी झाले होते. परंतु इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ग्रंथालयाला आधुनिक स्वरूप दिले. अमृतमहोत्सवानिमित्त ग्रंथालयाच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला होता. ग्रंथालयातर्फे १९९० आणि २००२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनात कार्यवाह आणि कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी योगदान दिले.
मनमिळावू, उत्तम वक्तृत्व, प्रशासनावर पकड तसेच उत्तम जनसंपर्क अशी त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. अनगळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालयाची प्रशस्त आणि टोलेजंग वास्तू उभी राहिली. राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानतर्फे देशातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, महाराष्ट्र सरकारतर्फे सर्वोत्कृष्ट ग्रंथालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तसेच शंभर वर्षांतील सर्वोत्कृष्ट ग्रंथालय असे पुरस्कार ग्रंथालयाला मिळाले. पॉलिटेक्निक कॉलेज आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) येथे लॅबमध्ये ते कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांनी ग्रंथालयाला वाहून घेतले. वडील दत्तात्रय अनगळ यांनी ग्रंथालयात विविध पदे भूषवली. कार्यकारिणी सदस्य मंगेश अनगळ यांच्या सहभागामुळे एका कुटुंबातील तिसरी पिढी ग्रंथालयासाठी काम करत आहे.
---------