कोथरूड : महापालिकेच्या उद्यान विभागात सध्या एकही अधिकृत ठेकदार नसल्याने उद्यान विभागाच्या वतीने सुरू असलेली वृक्षछाटणीही अनधिकृत पद्धतीनेच सुरू असून, हॉर्टिकल्चर मिस्त्रीच सध्या या बेकायदेशीर छाटणीचा सूत्रधार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उद्यान विभागात अधिकृत ठेकेदार नेमण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असल्या, तरी अनामत रक्कम ठेवण्यावर एकमत न झाल्याने आजही अनधिकृत ठेकेदारावरच उद्यान विभागाची भिस्त असल्याचे भीषण वास्तव आहे.पावसाच्या दरम्यान कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थान समितीची स्थापना केली असली, तरी पावसाच्या दरम्यान सर्रास झाडे पडण्याचे प्रमाण असतानाही त्याबाबत कोणताही अधिकारी गांभीर्याने विचार करीत नाही. उद्यान विभागाच्या वतीने देण्यात आलेली वृक्षछाटणीची कामे मोफत करावी लागतात. त्यामुळे या कामासाठी आवश्यक असलेला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ठेकेदारांकडून खासगी छाटणीला बेलगाम दर आकारण्याचे प्रमाण वाढले आहे.अधिकृत ठेकेदार नसल्याने अनेक मिस्त्री लोक काही ठेकेदारांना आपल्या हाताशी धरून सध्या काम करीत आहेत. त्यामुळे उद्यानाचे काम मार्गी लागत असले, तरी संबंधित ठेकेदार परवानगी घेतलेल्या सोसायटी आणि जागामालकांना अवाच्या सवा दर आकारत आहेत. याबाबत कोणाकडेही दाद मागता येत नाही. उद्यानाचे अधिकारी छाटणी परवानगी अर्ज आल्यानंतर संबंधित भागातील मिस्त्रींना पाहणी करण्याचा शेरा देतात. त्यानंतर पाहणी करून परवानगी देणे आणि नाकारण्याचा अधिकारच संबंधित मिस्त्रीकडे असल्याने या नव्या आर्थिक हितसंबंधाला सुरुवात होत आहे.(वार्ताहर)
उद्यान विभागाचे अधिकृत ठेकेदार गायब
By admin | Updated: July 8, 2015 02:38 IST