पुणे : महापालिकेतील राष्ट्रवादीचे सभागृह नेते सुभाष जगताप यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सहकारनगर पोलीस ठाण्यात बेहिशेबी मालमत्तेचा (अपसंपदा) गुन्हा दाखल केला आहे. जगताप यांच्या पत्नी उषा यांनाही आरोपी करण्यात आले असून तब्बल १ कोटी १२ हजार २१३ रुपयांची बेहिशेबी संपत्ती बाळगल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हेमंत वासुदेव भट यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, जगताप यांच्याविरुद्ध एसीबीकडे २०१२मध्ये तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्याची चौकशी एसीबीमार्फत सुरू होती. ही चौकशी ३१ जुलै २०१४ रोजी बंद करण्यात आली. परंतु तक्रारदार रवींद्र बराटे यांनी जगताप यांच्याविरोधात ३० सप्टेंबर २०१४ रोजी पुन्हा तक्रार अर्ज दिला होता. जगताप यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सादर केलेल्या शपथपत्राची छायांकित प्रत एसीबीकडे सादर करून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार एसीबीने त्याची पडताळणी केली आणि या अनुषंगाने चौकशी करण्यात आली होती. त्या चौकशीदरम्यान जगतापांनी चुकीची आणि खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले.
नगरसेवकाविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा
By admin | Updated: March 5, 2015 01:45 IST